लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील नवशिशू अतिदक्षता विभागातून चार महिन्यांहून अधिक काळ उपचार घेतल्यानंतर अतिशय कमी वजनाने जन्मलेले बाळ शनिवारी दुपारी घरी सुखरूप परतले. ६०० ग्रॅमपासून ते ३.५ किलोपर्यंतचा निरोगी अवस्थेत घरी जाण्यापर्यंतचा तिचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी असल्याचे मत रुग्णालयातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. याकरिता दक्षता विभागात लाखो रुपयांचा खर्च आला असला तरी या बाळावर मोफत उपचार करण्यात आले.
या बाळाच्या ३५ वर्षीय आईला गर्भधारणेच्या २५ व्या आठवड्यात अकाली प्रसूती झाली. गेल्या वर्षी केईएम रुग्णालयात या मुलीचा जन्म झाला. बाळाला श्वसनासंबंधी त्रास असल्यामुळे तिला चार महिने व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. याशिवाय बाळाच्या आतड्याला छिद्र होण्याची समस्या उद्भवली. त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. तिला सेप्सिससारखा संसर्गही झाला.
खासगी रुग्णालयांमध्ये ४०० ग्रॅम वजनाच्या बाळांनाही घरी पाठवले जाते. कारण त्याठिकाणी अत्याधुनिक सुविधा असतात. मात्र, सार्वजनिक रुग्णालयामध्ये सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने उपचार करून बाळ सुखरूप घरी जाणे ही अभिमानाची गोष्ट आहे.
वैद्यकीय विश्वात क्रांती
वैद्यकीय विश्वात मोठी क्रांती झाली असून ४०० ते ५०० ग्रॅम बाळांना सुद्धा सुखरूप घरी पोहोचविले आहे. नवशिशू अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. अनिथा हरिबालकृष्ण त्यासोबत डॉ. उमेश शर्मा, डॉ. अभिलाषा गुप्ता, डॉ. मुत्थू विजयानाथन, डॉ. श्वेता म्हात्रे आणि या विभागातील परिचारिकांनी मेहनत घेऊन या बाळाची व्यवस्थित काळजी घेतली.
नवशिशू अतिदक्षता
विभागातील डॉक्टर, परिचारिका यांनी बाळावर उपचार करताना खूप मेहनत घेतली. त्यामुळे आज चार महिन्यांनंतर बाळ घरी सुखरूप पोहोचले आहे. रुग्णालयात सध्या ४५ खाटांचा नवजात अतिदक्षता विभाग असून येत्या महिन्याभरात प्रसूती विभागाजवळच आणखी २० खाटांचा नवीन नवशिशू अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अकाली जन्मलेल्या बाळांना तत्काळ नवीन नवजात अतिदक्षता विभागामध्ये हलवणे अधिक सोपे होईल. -डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय
Web Summary : A premature baby, born at 600 grams, was discharged from KEM hospital after four months, weighing 3.5 kg. The baby, delivered at 25 weeks, faced breathing issues and underwent surgery. KEM provided free treatment, showcasing advanced care in public hospitals.
Web Summary : 600 ग्राम वजन का एक समयपूर्व शिशु चार महीने बाद केईएम अस्पताल से 3.5 किलो का होकर घर लौटा। 25 सप्ताह में जन्मी बच्ची को सांस लेने में तकलीफ थी और उसकी सर्जरी हुई। केईएम ने मुफ्त इलाज मुहैया कराया, जो सार्वजनिक अस्पतालों में उन्नत देखभाल का प्रदर्शन है।