Join us  

मुंबईत पत्रकार अर्णब गोस्वामींच्या गाडीवर हल्ला, पोलिसात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 8:48 AM

पालघर सामूहिक हत्याकांडाचे पडसाद सोशल मीडियावर चांगलेच उमटले होते. याप्रकरणाला अनेकांनी जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला.

मुंबई - रिपल्बिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्मावी यांनी पालघर हत्याकांडाच्या घटनेबाबत न्यूज चॅनेलवर जे वार्तांकन केले. त्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला आहे. पालघर मॉब लिंचींगमध्ये ३ हिंदू साधूंची हत्या करण्यात आली. त्यावरुन ८० टक्के हिंदू असलेल्या भारत देशात हिंदू साधूंची हत्या होतेयं, असे म्हणत अर्णब यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनेक नेटीझन्सने त्यांच्यावर केला आहे. कदाचित, याच घटेवरुन पत्रकार गोस्वामी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. मध्यरात्री पत्नीसोबत घराकडे जात असताना त्यांच्यावर दोन अज्ञातांनी हल्ला केला.

पालघर सामूहिक हत्याकांडाचे पडसाद सोशल मीडियावर चांगलेच उमटले होते. याप्रकरणाला अनेकांनी जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतशी संवाद साधत संपूर्ण घटनेची माहिती दिली. या घटनेमागे कुठलाही धार्मिक रोष नाही, कुणी धार्मिक रंग देऊन राजकारण करु नये, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. तर, या घटनेच्या निमित्ताने काही लोक जातीचे राजकारण करत आहेत. प्रत्यक्षात अटक करण्यात आलेल्या १०१ आरोपींमध्ये एकही मुस्लिम बांधव नाही. काही लोक जाणूनबुजून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाशी अवघे राज्य लढा देत असताना असे राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे. तसेच, यासंदर्भात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असेही गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पण, जबबदार वृत्तवाहिनी असलेल्या रिपल्बिक टीव्हीच्या माध्यमातून अर्णब गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. 

अर्णब यांनी आपल्या चॅनलवर या संदर्भात वार्तांकन करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही सडकून टीका केली होती. ईटलीवाली सोनियाजी... असा त्यांचा वारंवार उल्लेख केल्याने काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्यावर टीका केलीय. त्यातच, मध्यरात्री अर्णब गोस्मावी यांच्या गाडीवर २ अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून तपास सुरु आहे. आपल्या पत्नीसह ते स्टुडिओतून घराकडे जात असताना दोन अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला.

टॅग्स :पत्रकारपालघरमुंबईगुन्हेगारी