आयकर विभागाचा सहआयुक्त गजाआड
By Admin | Updated: April 26, 2015 00:52 IST2015-04-26T00:52:00+5:302015-04-26T00:52:00+5:30
विवाहितेचा पाठलाग करून तिच्यासोबत अश्लील व्यवहार केल्याप्रकरणी आयकर विभागाच्या सहआयुक्ताला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गजाआड केले.

आयकर विभागाचा सहआयुक्त गजाआड
मुंबई : विवाहितेचा पाठलाग करून तिच्यासोबत अश्लील व्यवहार केल्याप्रकरणी आयकर विभागाच्या सहआयुक्ताला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गजाआड केले. श्रीधर एस.आर. (३५) असे या सहआयुक्ताचे नाव असून त्याची गुजरात विभागात नियुक्ती झालेली आहे. न्यायालयाने त्याची रोख ५0 हजारांच्या जामिनावर सुटका केली.
तक्रारदार तरुणी आणि श्रीधर यांच्यात जुनी ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी ही तरुणी श्रीधरकडे कार्यालयीन काम करत होती. श्रीधरचे तेव्हापासून या तरुणीवर एकतर्फी प्रेम आहे. याआधीही त्याने तरुणीचा विनयभंग केला होता. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार तरुणी विवाहित असून बोरीवलीत राहते. शनिवारी सकाळी श्रीधरने तिचा घरापर्यंत पाठलाग केला. घराजवळ येताच त्याने तिला शिवीगाळ केली. तसेच तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या तरुणीने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. त्यानुसार कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून श्रीधरला पकडले.
२०१३ मध्ये श्रीधर मुंबई आयकर विभागात उपायुक्त पदावर कार्यरत होता. तेव्हा तक्रारदार तरुणी त्याच्याकडे खासगी मदतनीस म्हणून काम करत होती. कामावर रुजू झाल्यापासून श्रीधरची तरुणीवर वाईट नजर होती. त्याने अनेकदा तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. संधी साधून तिला लग्नाची मागणीदेखील घातली. पण ती फेटाळून लावत तरुणीने नोकरी सोडली. त्यानंतरही श्रीधर तरुणीच्या मागावर होता. तरुणीला अश्लील एसएमएस करून मानसिक त्रास देत होता. याला कंटाळून तरुणीने जानेवारीत आझाद मैदान पोलिसात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. मात्र श्रीधरने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर त्याला अंतरिम जामीन मिळाला. तक्रारदार युवतीच्या वतीने अॅड. महेश वासवानी, अॅड. वीरेंद्र गुप्ता आणि अॅड. श्याम चौधरी यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड. नवीन चौमाल यांनी काम पाहिले. हा गुन्हा उघड झाल्यानंतर आयकर विभागाने त्याची बदली मुंबईतून गुजरातमध्ये केली होती. (प्रतिनिधी)