नाट्यगृहे उघडण्यासाठी नटराजाला साकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST2021-09-02T04:11:58+5:302021-09-02T04:11:58+5:30
मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली नाट्यगृहे उघडण्यासाठी एकवटलेल्या रंगकर्मींनी राज्यातील विविध नाट्यगृहांसमोर महाआरती करत नटराजाला साकडे घातले. ...

नाट्यगृहे उघडण्यासाठी नटराजाला साकडे!
मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली नाट्यगृहे उघडण्यासाठी एकवटलेल्या रंगकर्मींनी राज्यातील विविध नाट्यगृहांसमोर महाआरती करत नटराजाला साकडे घातले. मुंबईत श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहासमोर सोमवारी रात्री ‘रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र’ या कलावंतांच्या मंचातर्फे महाआरती करण्यात आली.
कलावंतांच्या विविध मागण्या व नाट्यगृहे उघडण्याच्या संदर्भात शासनाला या मंचातर्फे याआधीच निवेदन देण्यात आले होते. या निवेदनानंतर १ सप्टेंबरला नाट्यगृहे व चित्रपटगृहे खुली करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याकरिता योग्य ती पावले लवकरात लवकर उचलावीत, यासाठी या मंचातर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी पालखीमध्ये नटराजाची स्थापना करून विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर रंगकर्मींनी नटराजाची आरती केली. राज्यातील विविध नाट्यगृहे व सिनेमागृहांबाहेरसुद्धा स्थानिक रंगकर्मींकडून आरती करण्यात आली. शासनाकडून मिळालेल्या आश्वासनावर रंगकर्मींचा विश्वास असून, शासनाने ते आश्वासन पाळून १ सप्टेंबरला नाट्यगृहे उघडावीत यासाठी आरतीचे आयोजन करण्यात आल्याचे ‘रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र’ या मंचातर्फे सांगण्यात आले. यावेळी विजय पाटकर, विजय गोखले, मेघा घाडगे, विजय राणे, संचित यादव, प्रमोद मोहिते, हरी पाटणकर, गोट्या सावंत आदींसह विविध स्तरांवरील रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.