Join us
Daily Top 2Weekly Top 5

जोगेश्वरी 'ट्रॉमा केअर'चा अतिदक्षता विभाग बंद; रुग्णांना पाठवतात इतर रुग्णालयांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:35 IST

कंत्राटदाराकडून मनुष्यबळाचा पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमधील अतिदक्षता विभाग (आयसीयू) सध्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी प्रशासनाने बंद ठेवला आहे. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

प्रलंबित देयकांमुळे कंत्राटदाराने मनुष्यबळाचा पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. त्यातून आता आयसीयू बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. येथील रुग्णांना उपचारासाठी 'कूपर', 'सेव्हन हिल्स' सारख्या रुग्णालयात पाठविले जात असल्याचे समोर आले आहे.

या रुग्णालयाला सप्टेंबर २०२२ पासून मॅक्सकेअर या ठेकेदाराकडून मनुष्यबळाचा पुरवठा केला जात आहे. २०२४ मध्ये त्यांचे कंत्राट संपले. परंतु, रुग्णालय प्रशासनाने १० फेब्रुवारीपर्यंत कराराला मुदतवाढ दिली होती. मात्र, सोमवारी वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित राहिले नसल्यामुळे आयसीयूतील रुग्ण अधिकच अत्यवस्थ झाले. त्यामुळे त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलविण्यात आले. १० फेब्रुवारीपर्यंत कंत्राटदाराच्या करारास मुदतवाढ देण्यात आली. आता त्याने मनुष्यबळाचा पुरवठा खंडित केला आहे.

'सेव्हन हिल्स'मध्ये हलविले

उद्धवसेनेचे आ. बाळा नर यांना ही माहिती कळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत १५ रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयात हलविले. कोणतीही पूर्वसूचना न देता आयसीयू बंद करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

कंत्राट तत्काळ रद्द करावे : आ. नर

पालिकेच्या रुग्णालयाची दयनीय अवस्था झालेली असून येथील डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी, कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. त्याचबरोबर ठेकेदारांची मुजोरी पाहता त्यांचे कंत्राट तत्काळ रद्द करावे. रुग्णालयाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोगेश्वरी मतदारसंघाचे आ. अनंत नर यांनी केली आहे.

नियमानुसार चाकैशी करून कारवाई

कंत्राटदाराची कोणती देयके प्रलंबित आहेत, याची चौकशी केली जाईल. मात्र त्यांनी प्रशासनासोबत चर्चा करणे आवश्यक होते. अचानक मनुष्यबळाचा पुरवठा खंडित करून रुग्णांशी हेळसांड करणे योग्य नाही. नियमानुसार या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता सुधीर मेढेकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :हॉस्पिटल