Join us  

जोगेश्वरीच्या ६ थांब्यांचा पश्चिम रेल्वेचा निर्णय रद्द; श्रेयवादावरून पक्षांमध्ये चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 4:14 AM

पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार ६ लोकलचे थांबे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र, प्रवाशांनी तीव्र आंदोलन करत, रेल्वे प्रशासनाला तक्रारीची दखल घेत निर्णय रद्द करण्यास भाग पाडले.

मुंबई : जोगेश्वरीच्या रेल्वे प्रवाशांना गोरेगाव आणि मालाड जलद लोकलमध्ये पुन्हा एकदा प्रवेश घेता येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार ६ लोकलचे थांबे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र, प्रवाशांनी तीव्र आंदोलन करत, रेल्वे प्रशासनाला तक्रारीची दखल घेत निर्णय रद्द करण्यास भाग पाडले. रेल्वेने हा निर्णय रद्द केला असला, तरी रेल्वेच्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपात वाद सुरू झाला आहे.जोगेश्वरी स्थानकात सकाळी गर्दीच्या वेळेतील ८.१४, ८.३१, ८.३६, ९.०५, ९.४१ आणि १०.०२ या वेळच्या लोकलचा थांबा ३ नोव्हेंबरपासून पूर्ववत होणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांनी सांगितले. यापैकी ८ वाजून ३६ मिनिटे, ९ वाजून ५ मिनिटे, ९ वाजून ४१ मिनिटे आणि १० वाजून २ मिनिटे या लोकल अंधेरी स्थानकात थांबणार नसून, ८.१४ आणि ८.३१ या वेळेच्या लोकलना अंधेरी थांबा कायम असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.पश्चिम रेल्वेने १ नोव्हेंबरपासून सकाळी जोगेश्वरी स्थानकातील सहा लोकलचे थांबे रद्द केले. अचानक थांबे रद्द केल्याने प्रवाशांनी जोगेश्वरी स्टेशन मास्टर कार्यालयाला घेराव घातला. शुक्रवारी दुपारी पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी थांबे पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अल्पावधीत समाजमाध्यमांवर भारतीय जनता पक्षाच्या जोगेश्वरी विधानसभेच्या नगरसेविका उज्ज्वला मोडक यांच्या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेने निर्णय घेतल्याचे फोटो, पोस्ट व्हायरल झाले.दुसरीकडे शिवसेनेचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी रेल्वे अधिकाºयांची भेट घेत, जोगेश्वरीचे थांबे पूर्ववत करण्याची मागणी केली. थांब्यासह जोगेश्वरी फलाट क्रमांक १ आणि २ च्या पुलांची दुरुस्ती, हार्बर मार्गावरील पादचारी पुलाचे काम लवकरच हाती घेतले जाईल, असे सांगत, रेल्वे अधिकाºयांच्या भेटीमुळेच थांबे रद्द केल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या.

टॅग्स :पश्चिम रेल्वेमुंबई