मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबतचा अहवाल कोर्टाने स्वीकारला आहे. त्यामुळे, रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून तिथे हॉटेल्स बांधताना माहिती लपवल्याचा आणि बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून विविध परवानग्या घेण्यात आल्याचा आरोप खासदार रवींद्र वायकर यांच्यावर होता. याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात महापालिकेचे उपअभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रविंद्र वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि वास्तुविशारद अरुण दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत होती. दरम्यान, मुंबई महापालिकेने रवींद्र वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद करून आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल कोर्टात दाखल केला होता. आता हा अहवाल गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने स्वीकारला आहे.त्यामुळे रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नेमकं काय होतं प्रकरण?रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले आहे. यासंबंधी परवानगी त्यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. रवींद्र वायकर हे चौकशीलाही उपस्थित राहिले होते. आता हे प्रकरण बंद करण्यात आले आहे.
ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेतदरम्यानच्या काळात रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली. सुरुवातीला रवींद्र वायकरांचा एका मताने पराभव झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र,फेरमतमोजणीत त्यांना ४८ मतांची आघाडी बघायला मिळाली होती. ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांचा पराभव झाला होता.