Join us
Daily Top 2Weekly Top 5

डीजी शिपिंगमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी; सीओसी स्कॅमप्रकरणी २४ जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 10:40 IST

संस्थेच्या यंत्रणेत घुसखोरी करून चुकीच्या पद्धतीने नोंदणी

मुंबई : डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंगमध्ये (डीजी शिपिंग) बनावट सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी (सीओसी) तयार करून इंजिनिअरिंग व नॉटिकल विभागातील एकूण २४ उमेदवारांनी नोकरी मिळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधितांविरोधात कांजूरमार्ग पोलिसांत  गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डीजी शिपिंग हे देशातील समुद्री प्रशासन व सागरी शिक्षणाचे प्रमुख कार्यालय आहे.  संस्थेच्या सिस्टीममध्ये घुसखोरी करून चुकीच्या पद्धतीने उमेदवारांची नोंदणी करणे ही गंभीर बाब आहे.

कांजूरच्या डीजी शिपिंग (मिनिस्टरी ऑफ पोर्टस, शिपिंग ॲण्ड वॉटर वेज, भारत सरकार) येथील कार्यालयात डेप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल) या पदावर कार्यरत असलेले प्रवीण नायर (वय ४९) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  तक्रारीनुसार,  १५ मार्च २०२४ रोजी इंजिनिअरिंग विभागाचे चीफ एक्झामिनर अजित सुकुमार यांनी नॉटिकल सल्लागार कॅप्टन अबुल कलाम आझाद यांना ई-मेलद्वारे खारघर येथील ग्लान्सवन शिप मॅनेजमेंट प्रा. लि.मध्ये काम करणारा मिशाल देव आनंद याचा ई-गव्हर्नन्स प्रणालीत संशयास्पद समावेश आढळल्य़ाचे सांगितले. आनंदने सादर केलेले सीओसी बुकलेट हे डीजी शिपिंगने जारीच केले नसल्याचे उघड झाले. चौकशीत, फेक नोंदी या कोलकाता परीक्षा केंद्राच्या लॉग-इन आयडीचा वापर करून केल्याचे आढळले. यात इंजिनिअरिंग विभागाच्या एकूण १३ फेक एंट्रीज व नॉटिकलच्या एकूण २ फेक एंट्रीज घेतल्याचे दिसले. म्हणून  संबंधित लॉग इन आयडी बंद केला.

कोलकाता केंद्रासोबत इतर ५ परीक्षा केंद्रांचा अभिलेख तपासताच, कोलकाताच्या आयडींच्या माध्यमातून इंजिनिअरिंग विभागाच्या ४६ , नॉटिकलच्या ५६ असा एकूण १०२  फेक उमेदवारांचा डेटा सिस्टीममध्ये अपलोड केल्याचे उघड झाले. 

सीओसी बुकलेट नेमके असते तरी कसे?

नाशिक शासकीय मुद्रणालय येथे विविध पदांसाठी रंगनिहाय सीओसी बुकलेट छापले जातात. यामध्ये चीफ इंजिनिअरसाठी लाल, सेकंड इंजिनिअरसाठी राखाडी, थर्ड/फोर्थ इंजिनिअरसाठी  केशरी आणि इलेक्ट्रो टेक्निकल इंजिनिअरसाठी मरून रंगाचे बुकलेट तयार केले जातात. ही बुकलेट्स उमेदवाराच्या नावासह लॅमिनेशन करून स्पीड पोस्टने पाठविली जातात. मात्र, फेक उमेदवारांनी ही प्रक्रिया पूर्णपणे बायपास करून बनावट बुकलेट तयार करत नोकरी मिळविली.

२४ उमेदवारांचे बिंग फुटले

इंजिनिअरिंग विभागातील ४६ उमेदवारांनी गेल्या दोन ते तीन वर्षांत कुठे कुठे काम केल्याच्या रोजगार नोंदी मागविल्यानंतर २४ उमेदवारांचे सीओसी प्राप्त झाले. त्यापैकी २१ उमेदवारांचे सीओसी झेरॉक्स प्रती ३ उमेदवारांचे बनावट सीओसी बुकलेट सापडले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Documents Used for Jobs in DG Shipping; 24 Booked

Web Summary : A scam in DG Shipping involved 24 candidates using fake certificates to secure jobs. An investigation revealed fraudulent entries in the system, bypassing standard procedures. Police have registered a case against the individuals involved.