जेएनपीटी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी!
By Admin | Updated: January 14, 2015 23:01 IST2015-01-14T23:01:29+5:302015-01-14T23:01:29+5:30
पनवेल व उरण वाहतूक शाखेच्या हद्दीतील गव्हाणफाटा ते जेएनपीटीकडे जासई मार्गावरुन नेहमीच अवजड वाहनांची वाहतूक होते

जेएनपीटी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी!
अलिबाग : पनवेल व उरण वाहतूक शाखेच्या हद्दीतील गव्हाणफाटा ते जेएनपीटीकडे जासई मार्गावरुन नेहमीच अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे अपघातांबरोबरच वाहतूक कोंडीची समस्याही दिवसेंदिवस भेडसावत आहे. ही वाहतूक सुरळीत रहावी यासाठी गव्हाणफाटा ते जेएनपीटीकडे (जासईमार्गे) अवजड वाहनांना येण्या- जाण्यासाठी सायंकाळी ५ ते रात्रौ ८ वेळात प्रवेशबंदी घोषित करण्यात आली आहे. ही अधिसूचना १ जानेवारी २०१५ ते पुढील आदेश होईपर्यंत अमलात राहील, अशी माहिती पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेच्या सूत्रांनी दिली आहे.
गव्हाणफाटा ते उरण परिसरातील नागरिक तसेच जेएनपीटी व सीएफएसमध्ये काम करणारा कामगार वर्ग नवी मुंबई व पनवेलकडे दररोज ये-जा करतो. अवजड वाहनांमुळे या रस्त्यावर अनेकदा नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. याशिवाय अपघातांची संख्याही वाढली आहे.
विशेषत: सायंकाळी ५ ते ८ या वेळेत रस्त्यावर वाहतुकीचा ओघ जास्त प्रमाणात असतो व या दरम्यान वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना, नोकरदार वर्गाला प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावे लागतो. वाहतूक कोंडी तसेच अपघातांमुळे परिसरातील ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलनेही केली आहेत. याचाच विचार करुन हे अवजड वाहनांचा प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.