Join us

‘जेएनपीए’ मुंबईत मालेट बंदरात भाड्याने घेतलेल्या जागेवर उभारणार कॉर्पोरेट कार्यालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:39 IST

दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य, ७० लाख कंटेनरचा विक्रम

मधुकर ठाकूर, लोकमत न्यूज नेटवर्क, उरण: जेएनपीए मुंबईतील मालेट बंदरात भाड्याने घेतलेल्या ३.१६ एकर क्षेत्रावर एक हजार कोटी रुपये खर्च करून कॉर्पोरेट कार्यालयासाठी २० मजल्यांची अद्ययावत इमारत उभारणार आहे. याबाबतची घोषणा अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

जेएनपीए बंदर देशातील सर्वांत मोठे मेगा बंदर म्हणजेच वाढवण बंदराची उभारणी करत आहे. जेएनपीए आणि वाढवण बंदरासाठी मुंबईत अत्याधुनिक कॉर्पोरेट कार्यालयाची आवश्यकता आहे. या प्रस्तावित कॉर्पोरेट कार्यालयासाठी फेरी वार्फ आणि मुंबई बंदराच्या डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल क्षेत्राला लागून असलेला मालेट बंदर रोड येथील १२,८०४ चौ.मी. (३.१६ एकर) भूखंड बंदर प्राधिकरणाकडून भुईभाड्याने घेतला आहे. प्रस्तावित २० मजल्यांच्या इमारतीमध्ये जेएनपीएचे कॉर्पोरेट कार्यालय असणार आहे.

इमारतीत बंदराची तसेच डीजी शिपिंग, आयपीजीएल आणि आयपीआरसीएलसारख्या सहयोगी संस्थांची कार्यालयेही असणार आहेत. वरच्या मजल्यावर डिजिटल वेधशाळा असणार आहे. इतर मजल्यांवर जेएनपीए, वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडची कॉर्पोरेट कार्यालये तसेच केंद्र आणि राज्य सरकारची इतर कार्यालये असतील.

७० लाख कंटेनरचा विक्रम

जेएनपीएने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ७० लाख कंटेनरची (टीईयूस) विक्रमी हाताळणी केली आहे. बंदराच्या या कामगिरीचा आनंद उन्मेष वाघ यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा केला. ही ऐतिहासिक कामगिरी म्हणजे जेएनपीएचे ऑपरेशनल उत्कृष्टतेचे प्रयत्न आणि त्याच्या टर्मिनल ऑपरेटरच्या मेहनतीचे द्योतक असल्याचेही वाघ यांनी स्पष्ट केले.

दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

  • जमीन, इमारत आणि अन्य सुविधांसह एकूण प्रकल्पाची किंमत अंदाजे १००० कोटी असणार आहे. इमारतीची रचना ४.० एफएसआयसह केली जात आहे. 
  • नऊ लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्राचे डिझाइन, अभियांत्रिकी, बांधकाम आणि प्रकल्प व्यवस्थापन सेवांसह प्रकल्प विकासासाठी सल्लागार म्हणून इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (इआयएल)ची नियुक्ती केली आहे. 
  • आवश्यक मंजुरी, परवानग्या मिळाल्यानंतर दोन वर्षांत प्रस्तावित इमारतीचे काम पूर्ण करण्याचे जेएनपीएचे लक्ष्य असल्याची माहितीही वाघ यांनी दिली.
टॅग्स :जेएनपीटीमुंबई