Join us  

वरळीमध्ये पोलिसांना सव्वा कोटींचे घर फक्त ५० लाखांत...! जितेंद्र आव्हाड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 6:10 AM

बीडीडी चाळीत सुमारे दोन हजार ९०० घरे ही पोलीस सेवा निवासस्थाने आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बीडीडी चाळीतील पोलीस सेवा निवासस्थानात १ जानेवारी २०११ पूर्वी राहत असलेल्या सेवानिवृत्त, मृत किंवा सेवेतील पोलिसांना बांधकाम दराने घरे देण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी सांगितले.

बीडीडी चाळीत सुमारे दोन हजार ९०० घरे ही पोलीस सेवा निवासस्थाने आहेत. यापैकी ७०० पोलीस निवासस्थाने ही बीडीडी प्रकल्पात असतील. उरलेली २२०० घरे माहिम, वरळी ते दादर या परिसरात पोलीस सेवा वसाहतीसाठी दिली जातील, अशी माहिती मंत्री आव्हाड यांनी दिली. बीडीडी परिसरात किमान एक ते दीड कोटी रुपये इतका दर असताना विशेष बाब म्हणून ५० लाख रुपयांना घरे त्यांना मिळावीत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही आव्हाड यांनी सांगितले.

बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, बीडीडी चाळीत अनेक वर्षांपासून लोक राहत आहेत. या चाळींचा पुनर्विकास ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. हे काम पुढे न्यायचे आहे. मात्र, पुनर्विकास करीत असताना स्थानिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा. या भागात उपलब्ध असलेल्या इतर घरांच्या बाजारभावाच्या किमतींपेक्षा कमी दराने त्यांना घरे मिळावीत, यासाठी गृहनिर्माण विभागाने विचार करावा. नायगाव, एन. एम. जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. 

या चाळींमध्ये २०११च्या आधीपासून पोलीस सेवा निवासस्थानात राहात असलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना बांधकाम दराने ही घरे देता यावीत, यासाठी गृहनिर्माण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई पोलीसजितेंद्र आव्हाड