जिजाऊंची शिकवण प्रेरणादायी
By Admin | Updated: January 12, 2015 22:10 IST2015-01-12T22:10:59+5:302015-01-12T22:10:59+5:30
ज्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक योध्दा राजा घडवला त्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची शिकवणूक साऱ्या जगाला प्रेरणा देणारी आहे

जिजाऊंची शिकवण प्रेरणादायी
महाड : ज्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक योध्दा राजा घडवला त्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची शिकवणूक साऱ्या जगाला प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन महाडचे आमदार भरत गोगावले यांनी केले. राजमाता जिजाऊंचा ४१७वा जयंती उत्सव सोहळा त्यांच्या समाधीस्थळ रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त झालेल्या अभिवादन सभेत आमदार गोगावले बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे होते.
रायगड जिल्हा परिषद व पाचाड ग्रामस्थांच्या वतीने यानिमित्त भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी आमदार गोगावले पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी आपल्या आयुष्याचा अखेरचा श्वास या पाचाडच्या भूमीत सोडला ती ही भूमी अत्यंत पवित्र अशी आहे. मात्र या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आज कुठलेच भान राहिलेले नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे. यावेळी पंचायत समिती सभापती दीप्ती फळसकर, तहसीलदार संदीप कदम, जि.प. सदस्य सूर्यकांत कालगुडे, दलितमित्र मधुकर गायकवाड, रघुवीर देशमुख, सरपंच ज्योती गायकवाड, आदींसह पाचाड व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)