ज्वेलर्सचे दुकान फोडले
By Admin | Updated: September 21, 2015 02:40 IST2015-09-21T02:40:41+5:302015-09-21T02:40:41+5:30
ज्वेलर्सच्या दुकानात एसीच्या डक्टमधून घुसलेल्या लुटारूंनी पावणेतीन कोटींचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी मुलुंड नवघरमध्ये घडली.

ज्वेलर्सचे दुकान फोडले
मुंबई: ज्वेलर्सच्या दुकानात एसीच्या डक्टमधून घुसलेल्या लुटारूंनी पावणेतीन कोटींचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी मुलुंड नवघरमध्ये घडली. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चार जणांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, नवघर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुलुंड पूर्व संत रामदास मार्गावर राहणारे सराफ सुहास पुरुषोत्तम खेडकर (५४) यांचे हनुमान चौकात सुवर्णकार नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी निघून गेले. मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास दोन लुटारू दुकानातील एसीच्या मार्गाने आतमध्ये शिरले. तर दोघे जण दुकानाबाहेर पहारा देत होते. दुकानातील ९०० गॅ्रम सोन्याचे
दागिने घेऊन या आरोपींनी पळ काढला.
रविवारी घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी याचा अधिक तपास सुरू केला. दुकान लुटल्याची माहिती मिळताच खेडकर यांनी दुकानाकडे धाव घेतली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दुकानातून तब्बल २ कोटी ७२ लाख ६० हजारांचा ऐवज चोरी झाल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चौघांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामदास मोरे यांनी दिली. (प्रतिनिधी)