Join us
Daily Top 2Weekly Top 5

जहांगीर आर्ट दालन खुले होणार; राणीच्या बागेसाठी मात्र प्रतीक्षा करावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 07:21 IST

मागील वर्षी १५ मार्चपासून बंद करण्यात आलेले जहांगीर कलादालन कोरोनाविषयक सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करून पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे.

मुंबई : कोरोना संक्रमणाचा धोका असल्यामुळे मागील वर्षभरापासून बंद असलेले कुलाबा येथील जहांगीर कलादालन पुन्हा एकदा रसिकांसाठी खुले होणार आहे. कला क्षेत्रातील विद्यार्थी आणि कलाप्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे. कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी असलेले हे हक्काचे दालन तब्बल ११ महिन्यांनी खुले होणार असल्याने कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील वर्षी १५ मार्चपासून बंद करण्यात आलेले जहांगीर कलादालन कोरोनाविषयक सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करून पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे. १६  फेब्रुवारीपासून येथे ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस‌्,’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस‌्’चे विजेते बिभूती अधिकारी यांच्या ‘फेथ ॲण्ड फ्युरी’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मुंबईतील सर्व व्यवहार हळूहळू सुरू करण्यात येत असल्याने भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे द्वारही खुले करावे याबाबत उद्यानाच्या संचालकांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना प्रस्ताव पाठविला आहे.  लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करून एकच आठवडा उलटला असल्याने पालिका सावध पावले टाकत आहे.  राणीबागेचे द्वार उघडण्यासाठी मुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.मार्च २०२०पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे राणीची बागही या कालावधीत बंद ठेवण्यात आली होती.  लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे राणीची बागही खुली करावी, असा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. राणीबागेचे द्वार सर्वसामान्यांसाठी उघडल्यानंतरही सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळले जातील, याची खबरदारी घेतली जाणार आहे. याबाबतचा आराखडाही प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाने तयार केला आहे. मात्र या प्रस्तावाला अद्याप आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. पाच कोटींचे नुकसान मार्च २०२० पासून आतापर्यंत महापालिकेचे पाच कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. ‘द रोलिंग पेंटिंग’मधून अनोखी कलापर्वणीनिसर्गसंवर्धनाचा संदेश देणारे जगातले पहिले इनोव्हेटिव्ह पेंटिंग ‘द रोलिंग पेंटिंग’ या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आहे. ५९४ पीव्हीसी पाइप्सचा वापर करून ५ बाय ३ फुटांचे हे पेंटिंग तयार केले आहे. प्रत्येक पीव्हीसी पाइपवर निसर्ग, हरीण, पक्षी, वाघ, मोर अशी जैवविविधता रेखाटण्यात आली आहे. विशिष्ट पद्धतीने या पाइप रोल केल्यावर तब्बल १२ विविध पेंटिंग्ज पाहायला मिळतील. अशा पद्धतीची पेंटिंग कलारसिकांना प्रथमच बघायला मिळणार आहेत. २२ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल. आर्टिस्ट, स्कल्पचर, कार्टूनिस्ट बिभूती अधिकारी हे मूळचे पश्चिम बंगालचे आहेत. पहिल्यांदाच पीव्हीसी पाइप्सचा वापर करत त्यांनी काढलेली चित्रे या प्रदर्शनात असतील. राणीबाग सुरू करण्याचा प्रस्ताव सादर झाला आहे. मात्र अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढच्या महिन्यात यावर निर्णय होऊ शकेल. - इक्बाल सिंह चहल,महापालिका आयुक्तअशी सुरू आहे तयारी गर्दी टाळण्यासाठी प्राणिसंग्रहालयात ठरावीक अंतरावर वर्तूळ आखण्यात आले आहे. प्राणी-पक्ष्यांच्या पिंजऱ्यासमोर आणि तिकीट खिडकीजवळही असे गोल आखलेले आहेत, तसेच जागोजागी सॅनिटायझर, कचराकुंडी आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. राणीबागेत सामान आणण्यास मनाई असेल, तसेच प्राणी-पक्ष्यांच्या कक्षाबाहेरील पूल बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतरही राणीबागेत गर्दी झाल्यास काही वेळेपुरते उद्यानाचे दरवाजे बंद होणार आहेत.