जयंतरावांची सांगलीसाठी ‘टाईट फिल्डिंग’- कारण राजकारण

By Admin | Updated: August 18, 2014 23:36 IST2014-08-18T22:40:06+5:302014-08-18T23:36:07+5:30

विधानसभा निवडणूक : मदन पाटील, संभाजी पवारांची ‘विकेट’ काढण्याचे मनसुबे, नवी समीकरणे, नवे डाव

Jayantrav's 'Tight Fielding' for Sangli - Because Politics | जयंतरावांची सांगलीसाठी ‘टाईट फिल्डिंग’- कारण राजकारण

जयंतरावांची सांगलीसाठी ‘टाईट फिल्डिंग’- कारण राजकारण

श्रीनिवास नागे-सांगली --आधी एकच होता... आता त्यात आणखी एकाची भर पडली... मात्र यंदा या दोघांचीही ‘विकेट’ काढायचीच, यासाठी ‘त्यांनी’ ‘टाईट फिल्डिंग’ लावली आहे. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि सांगली विधानसभा मतदारसंघ याबाबतचे हे नवे समीकरण... आणि ते दोघे आहेत, अर्थातच उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील आणि भाजपचे आमदार संभाजी पवार.
वसंतदादा घराणे आणि जयंतरावांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य जगजाहीर आहे. जिल्ह्यातील सहकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याची प्रचिती आली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत दादांचे नातू आणि काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांच्याविरोधात जयंतरावांनी रसद पुरवल्याने संभाजी पवार निवडून आले होते. यंदा मदन पाटील पुन्हा रिंगणात उतरत आहेत. मात्र जयंतराव आणि संभाजी पवार यांच्यातही दुष्मनी निर्माण झाली आहे. परिणामी दोघांचाही काटा काढण्यासाठी जयंतरावांनी सहा महिन्यांपासून ‘फिल्डिंग’ लावली आहे. सांगली शहर आणि परिसरातील आठ गावांमध्ये जयंतराव गटाने हातपाय पसरले आहेतच, शिवाय काँग्रेस आणि भाजपमधून त्यांचे नवे मोहरे पुढे येत आहेत. ते पाहता त्यांनी ‘फिल्डिंग’ आवळत आणल्याचे दिसून येत आहे.
यावेळी संभाजी पवार स्वत: लढण्यास इच्छुक नसून, त्यांनी मुलाचे- पृथ्वीराज यांचे- नाव पुढे केले आहे. मात्र त्या उमेदवारीत असंख्य अडथळे निर्माण झाले आहेत. सुधीर गाडगीळ, नीता केळकर, श्रीनिवास पाटील, शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे, धनपाल खोत, हणमंत पवार अशी इच्छुकांची फौज भाजपमधून लढण्यास पुढे आली आहे. लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांच्या उमेदवारीला थेट विरोध केल्याने पवारांचे भाजपमधील विरोधक वाढले. संजय पाटील खासदार झाल्याने त्या विरोधाला धार आली आहे. खा. पाटील यांना निवडणुकीत उघड मदत केल्याने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिनकर पाटील यांचे नाव भाजपमधून सुरुवातीला पुढे आणले गेले, मात्र नंतर ते मागे पडले. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दबाव आणल्याने दिनकर पाटील यांनी पाय मागे घेतला, असे सांगितले जात असले तरी जयंतरावांशी पंगा घेतल्यानेच त्यांचा पत्ता कट झाला, अशी कुजबूज भाजपच्या वर्तुळात सुरू आहे.
त्यानंतर कुपवाडचे नगरसेवक धनपाल खोत आणि काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य पप्पू डोंगरे यांची दावेदारी पुढे आली. खोत एकेकाळी वसंतदादा घराण्याचे निष्ठावंत, तर डोंगरे आतापर्यंत मदन पाटील यांचे कट्टर समर्थक होते. मागील महापालिका निवडणुकीपासून खोत यांनी जयंतरावांशी जवळीक साधली, तर डोंगरे यांनी लोकसभा निवडणुकीपासून खा. संजय पाटील यांच्याशी हात मिळवला. खा. पाटील आणि जयंतरावांच्या इशाऱ्यावर त्यांचे शक्तिप्रदर्शन सुरू आहे. भरीस भर म्हणून आता राष्ट्रवादीचे विधानसभा श्रेत्राचे अध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक श्रीनिवास पाटील यांचे घोडेही भाजपमध्ये दामटले जात आहे. ते तर जयंतरावांचे विश्वासू साथीदार. रविवारी जयंतरावांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षपद स्वीकारून सर्वांनाच धक्का दिला. या सोहळ्याची जबाबदारी नीता केळकर आणि भाजपमधील इतर इच्छुकांकडे होती, मात्र त्यातून संभाजी पवार गटाला पद्धतशीर डावलण्यात आले. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पवारांची ‘विकेट’ काढायचा हा डाव असल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे मदन पाटील यांनाही काँग्रेसच्या उमेदवारीतून बाद करण्यासाठी दिगंबर जाधव, शहराध्यक्ष मुन्ना कुरणे, दिवंगत नेते गुलाबराव पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील अशी इच्छुक मंडळी पुढे येत आहेत. मदन पाटील यांच्यावर त्यांनी टीकेचा भडीमार चालवला आहे. या मंडळींचा बोलविता धनी अजून समोर आलेला नाही, मात्र मागील निवडणुकीत दोन-तीन अपक्षांना रसद पुरविणाऱ्याकडे बोट दाखवले जात आहे.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांना ‘मनसे’त जाण्यासाठी इस्लामपुरातूनच सल्ला देण्यात आल्याचे बोलले जाते. मात्र ‘मनसे’तून माजी आमदार नितीन शिंदे यांच्या पत्नी स्वाती यांच्या हालचाली वाढल्याचे दिसताच जयंतरावांनी थेट शिंदे यांच्या सहकारी संस्थांना भेट देण्याच्या निमित्ताने ‘मनसे’ला कानमंत्र दिला. काही दिवसांपूर्वी दिनकर पाटील यांचे एकेकाळचे समर्थक आणि सांगलीवाडीचे माजी नगरसेवक हरिदास पाटील यांनाही ‘मनसे’तून उमेदवारी मिळवून देण्याबाबत चाचपणी झाली होती.
वरील सर्वच मोहऱ्यांचे स्वत:चे ‘व्होट पॉकेटस्’ आहेत. त्या जोरावर भाजप किंवा अपक्षांमधून तगडा उमेदवार द्यायचा, काहीजणांना बंड करायला लावायचे आणि संभाजी पवारांसह मदन पाटलांचा निवडणुकीत पाडाव करायचा, अशी रणनीती पुढे येत आहे. ही ‘फिल्डिंग’ जयंतरावांनी आता ‘टाईट’ करत आणली आहे...
महापालिकेतील टोचणी कायम
जयंतरावांकडून सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची सत्ता हिसकावून घेण्यात मदन पाटील यशस्वी ठरले. त्यावेळी संभाजी पवारही जयंतराव गटाच्या विरोधात गेले होते. तो सल जयंतरावांना अजून टोचत आहे. लोकसभा निवडणुकीत संजय पाटलांकडून काँग्रेसच्या प्रतीक पाटलांची ‘विकेट’ काढण्यात अनेकांचा हात होता. आता मदन पाटील आणि संभाजी पवार यांची ‘विकेट’ काढण्यासाठीही असेच हात सरसावणार आहेत.

Web Title: Jayantrav's 'Tight Fielding' for Sangli - Because Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.