जयंत पाटील यांनी घेतलाय नरेंद्र मोदी लाटेचा धसका!
By Admin | Updated: August 11, 2014 23:33 IST2014-08-11T23:14:18+5:302014-08-11T23:33:50+5:30
विधानसभा निवडणूक : एक पाय मुंबईत, तर दुसरा इस्लामपुरात

जयंत पाटील यांनी घेतलाय नरेंद्र मोदी लाटेचा धसका!
अशोक पाटील - इस्लामपूर -- इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आपल्यासाठी ‘सेफ’ असल्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील सांगत असले तरी त्यांनी मोदी लाटेचा धसका घेतल्याचे स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेच्या प्रभावामुळे मतदारांनी काही ठिकाणी उमेदवार न पाहता मतदान केल्याचे दिसून आल्याने जयंतरावांना धास्ती वाटत असल्याचे बोलले जाते. मंत्रीपदाची जबाबदारी आणि मुंबईचे पालकमंत्री असल्याने त्यांचा एक पाय मुंबईत, तर दुसरा इस्लामपुरात असे चित्र निर्माण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता. त्याचा निवडणुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच आता काँग्रेस आघाडीनेही सोशल मीडियाचा वापर वाढवला आहे. मोदी लाटेच्या धास्तीने जयंतरावांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून दररोज संदेश पाठवण्याचा सपाटा लावला आहे.
लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्याविरोधात कोण, असा प्रश्न काँग्रेस आघाडीपुढे होता. आता विधानसभा निवडणुकीत मात्र याउलट परिस्थिती आहे. जयंत पाटील यांच्याविरोधात कोण, याबाबत महायुतीमध्ये मंथन सुरू आहे. असे असले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जयंतरावांविरोधात तगडा उमेदवार देण्याचा चंग बांधला आहे. जयंतरावांकडे मुंबईच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी आहे. मात्र शेट्टींच्या कुरघोड्या आणि मोदी लाटेच्या धास्तीने त्यांनी इस्लामपूर मतदारसंघालाच जास्तीत-जास्त वेळ देणे पसंत केले आहे. परिणामी त्यांचा एक पाय मुंबईत, तर दुसरा इस्लामपुरात असे चित्र निर्माण झाले आहे.
काँग्रेसचे नानासाहेब महाडिक यांनी जयंतरावांविरोधात शड्डू ठोकण्याचे जाहीर केले असले तरी ते नक्की कोणत्या पक्षातून लढणार, याबाबत संभ्रम कायम आहे. त्यातच मिरज पश्चिम भागातील कवठेपिरानचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला आहे. माने यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन थेट जयंतरावांना आव्हान दिल्याचे बोलले जाते. कारण मिरज पश्चिममधील आठ गावांत माने गटाची मदत जयंतरावांना मिळत होती. ती आता बंद झाली आहे.
सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून जयंत पाटील यांची कोंडी करण्याचे हे पद्धतशीर प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. तशी दबक्या आवाजात चर्चाही सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकाल, नरेंद्र मोदी लाटेचा अद्याप न ओसरलेला प्रभाव आणि मतदारसंघात होत असलेली स्वत:च्या कार्यकर्त्यांकडून कोंडी याचा धसका जयंतरावांनी घेतला असल्याचे दिसत आहे.