Join us  

‘असशील तू कोणी मोठा स्टार, पण संपूर्ण अलिबाग खरेदी केलं का?’, चाहत्यांसमोरच जयंत पाटील यांनी शाहरुखला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 8:39 AM

गेट-वेवर चाहत्यांची झालेली गर्दी आणि त्यामुळे झालेला उशीर यामुळे संतापलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी बॉलिवूड बादशहा शाहरुख खानची त्यांच्या चाहत्यांसमोरच खरडपट्टी काढली

ठळक मुद्देशेकाप नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी बॉलिवूड बादशहा शाहरुख खानची त्यांच्या चाहत्यांसमोरच खरडपट्टी काढलीजयंत पाटील शाहरुखवर संतापल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहेगेट-वेवर चाहत्यांची झालेली गर्दी आणि त्यामुळे झालेला उशीर यामुळे जयंत पाटील शाहरुखवर चांगलेच संतापले

मुंबई - गेट-वेवर चाहत्यांची झालेली गर्दी आणि त्यामुळे झालेला उशीर यामुळे संतापलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी बॉलिवूड बादशहा शाहरुख खानची त्यांच्या चाहत्यांसमोरच खरडपट्टी काढली. संतापलेल्या जयंत पाटील यांचा पारा इतका चढला होता की, त्यांनी शाहरुख खानला सर्वासमोर खडे बोल सुनावले. जयंत पाटील शाहरुखवर संतापल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. 

३ नोव्हेंबरला शाहरुख आपल्या अलिबागमधल्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करुन परतत होता. शाहरुख खान आपल्या स्पीड बोटने गेट-वेवर आला होता. शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी गेट-वेवर चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पण शाहरुख खान बोटीतच बसून राहिला होता. यामुळे गर्दी वाढत गेली आणि यामुळे इतर बोटींना जाण्यास उशीर झाला. त्यातच जयंत पाटील हेदेखील आपल्या स्पीड बोटने अलिबागला चालले होते. पण शाहरुख खानमुळे त्यांना अर्धा तास उशीर झाल्याने ते प्रचंड संतापले आणि त्यांचा पारा चढला. 

 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत जयंत पाटील अत्यंत स्पष्टपणे शाहरुख खानला सुनावताना दिसत आहेत. ‘असशील तू कोणीही मोठा स्टार, पण संपूर्ण अलिबाग काय तुम्ही खरेदी केलं का?’ अशा शब्दात त्यांनी शाहरुखला सुनावलं. जयंत पाटील आपल्या बोटीने पुढे गेल्यानंतर शाहरुख शांतपणे बोटीतून बाहेर पडतो आणि निघून जातो. शाहरुख यावेळी जयंत पाटील यांना काहीच उत्तर न देता निघून गेला. 

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया - 'दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मध्यमवर्गीय, गरीब लोक गेट-वेवर येतात. पण गर्दी बघून शाहरुख बोटीतच बसला होता. पोलीसदेखील शाहरुखला संरक्षण देण्यात व्यस्त होते यावर माझा आक्षेप होता. त्याच्या संरक्षणासाठी उगाच लोकांवर काठ्या उगारल्या जात होत्या. माझासुद्धा हात पोलिसांनी पकडला होता. शाहरुखने आल्यानंतर लगेच उतरुन जायला हवं होतं. पण तो बोटीत बसून सिगरेट पित होता, गप्पा मारत होत्या. त्याच्यामुळे सगळ्या बोटी थांबल्या होत्या. मलादेखील अर्धा तास उशीर झाला. पोलीस लोकांसाठी आहेत की या अभिनेत्यांसाठी आहेत ? आपल्या स्टारडमचं असं प्रदर्शन करु नये. मी त्याचा आदर करतो पण हे चुकीचं आहे', अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.  

टॅग्स :शाहरुख खानजयंत पाटील