जव्हारचा ५६३ वा शाही उरूस थाटात साजरा
By Admin | Updated: October 6, 2015 00:16 IST2015-10-06T00:16:58+5:302015-10-06T00:16:58+5:30
जव्हार शहरात दरवर्षाप्रमाणे यंदाही हजरत औलिया शाह सदरोद्दीन्न बदरोद्दीन चिश्ती (र.अ.) यांचा उरूस शनिवार, रविवार व सोमवार असा तीन दिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला.

जव्हारचा ५६३ वा शाही उरूस थाटात साजरा
- हुसेन मेमन, जव्हार
जव्हार शहरात दरवर्षाप्रमाणे यंदाही हजरत औलिया शाह सदरोद्दीन्न बदरोद्दीन चिश्ती (र.अ.) यांचा उरूस शनिवार, रविवार व सोमवार असा तीन दिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला.
पहिल्या दिवशी जामा मशीद येथून भव्य मिरवणूक निघाली. मशिदीपासून पाचबत्तीनाका व नेहरू चौकातून पुन्हा दर्ग्याकडे येऊन पवित्र संदलवाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशी भव्य चादर मिरवणूक जामा मशिदीपासून मोठ्या उत्साहात निघाली. यामध्ये मुरीद व फकीर यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्या वेळी ठिकठिकाणी चौकात रातिफचा सोहळा ढोलताशे, नगारे या वाद्यांत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
पाचबत्तीनाका, नेहरू चौक व त्यानंतर गांधी चौक व परत दर्गाह असा या मिरवणुकीचा प्रवास असतो. हजरत औलिया शाह सदरोद्दीन बदरोद्दीन चिश्ती (र.अ.) यांच्या दर्ग्यावर सन्मानपूर्वक चादर चढविण्यात आली. सर्वधर्मीय लोक या वेळी सहभागी झाले होते. फुलांच्या चादरी अर्पण केल्या गेल्या. त्यानंतर, उर्स कमिटीतर्फे लंगरचे आयोजन करण्यात आले होते. पूर्ण गावाला व पाहुण्यांना भोजन दिले गेले. या कार्यक्रमानंतर पहाटेपर्यंत चालणारा बहारदार कव्वालीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कव्वालीस जवळजवळ १ लाख ४५ हजार चाहत्यांची हजेरी होती. खासकरून या रात्री जव्हार बसस्थानकातही सकाळपर्यंत जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.
जव्हार व परिसरातील असंख्य मान्यवर मंडळी व आदिवासी बांधवही मोठ्या संख्येने कव्वालीच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. तिसऱ्या दिवशी म्हणजे नवमीस सायंकाळी ख्वाजापीर यांच्या संदलवाटपाचा कार्यक्रम राजेसाहेबांच्या उपस्थितीत झाला.
दरवर्षीप्रमाणे पूर्ण गाव तसेच एसटी स्टॅण्डजवळील परिसर गजबजलेला आहे. आकाशपाळणे, वेगवेगळे खेळ, मौत का कुआँ, प्रदर्शने, विविध प्रकारचे स्टॉल, खेळणीची दुकाने मोठ्या संख्येने असतात. बरीचशी मंडळी बाहेरगावांहून खास या उरुसासाठी उपस्थित होती. या महोत्सवात पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ३०० पोलीस कर्मचारी व ३० अधिकारी नेमण्यात आले असल्याचे जव्हारचे पोलीस निरीक्षक केशवराव नाईक यांनी सांगितले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी ऊर्स जलसा कमेटीचे अध्यक्ष अनिस पठाण, उपाध्यक्ष जावेद पठाण व आश्फाक पठाण, सेक्रेटरी मोईन मनियार व मुद्दसर खाटीक, खजिनदार सलीम
मेनन, सदस्य अतलाफ मेनन, इमरान लुलानिया, तंझीम परिजादा आदींनी खूप मेहनत घेतली.
(वार्ताहर)
यंदाच्या उरुसात पाहुण्यांना व गावकऱ्यांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून व या तिन्ही दिवसांत कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी काटेकोर दक्षता घेण्यात आली. यात हिंदू-मुस्लिमबांधवांनी चांगली साथ दिली तसेच पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. उरुस सुरळीत पार पाडण्याकरिता जलसा कमेटीच्या व सुन्नी मुस्लिम कमेटीच्या सदस्यांनी मन:पूर्वक सहकार्य केल्याने तो शांततेत संपन्न झाला.
- अनिल लियाकत पठाण, अध्यक्ष - उर्स जल्सा कमेटी, जव्हार