मुंबई - बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोरील जवाहरलाल दर्डा चौकात आज मंगळवार, २२ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता स्वातंत्र्य संग्राम सेनानी, द्रष्टे नेते, लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश भाजपाध्यक्ष आणि राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबईचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होईल. या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांच्या उपस्थितीत ५ जून २००६ रोजी दलाल स्ट्रीट व मुंबई समाचार मार्गावरील चौकाचे स्वर्गीय जवाहरलाल दर्डा चौक असे नामकरण करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना विलासराव देशमुख यांनी, ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ला लागून असलेल्या हमाम स्ट्रीटवरील राज्य हाउसिंग फायनान्स सोसायटीचे जवाहरलाल दर्डा दहा वर्षे अध्यक्ष होते. या कार्यालयात बसून त्यांनी गृहनिर्माणाच्या कार्याला गती देण्याचे काम केले. सुदैवाने त्यांचे कार्यालय ज्या भागात आहे, त्याच भागातल्या महत्त्वाच्या चौकाला त्यांचे नाव देण्यात येत आहे, हा चांगला योग आहे,’ असे सांगितले होते. याच इमारतीपासून जवळ असणाऱ्या हॉंगकॉंग बँकेच्या इमारतीत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे मुख्यालय होते. त्याचेही जवाहरलाल दर्डा अनेक वर्ष सदस्य होते. त्याच चौकात उद्या जवाहरलाल दर्डा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांचा जन्म २ जुलै १९२३ रोजी झाला. २५ नोव्हेंबर १९९७ रोजी त्यांचे निधन झाले. विद्यार्थीदशेतच क्रांतिकारी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वातील आझाद हिंद सेनेच्या यवतमाळ शाखेची स्थापना करून त्यांनी आपले देशप्रेम दाखवून दिले होते. पुढे महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेत ते स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले. त्यामुळे त्यांना अटक करून यवतमाळ कारागृहात ठेवण्यात आले होते. १९४२ साली इंग्रजांविरुद्ध आंदोलन केल्यामुळे पावणे दोन वर्षे त्यांना जबलपूरच्या जेलमध्ये कारावास भोगावा लागला.
जवाहरलाल दर्डा यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये उद्योग, वीज, नगर विकास, जलसंपदा, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, पर्यटन, क्रीडा अशा विविध विभागांचे मंत्री म्हणून काम पाहिले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या ‘दैनिक लोकमत’चे ते संस्थापक संपादक होते. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने दोन वेळा टपाल तिकिटे जारी केली. तर जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने शंभर रुपयांचे नाणे काढले होते.