जव्हार न्यायालयाच्या इमारतीला अखेर मंजुरी
By Admin | Updated: August 12, 2014 00:23 IST2014-08-11T23:40:55+5:302014-08-12T00:23:54+5:30
राजे यशवंतराव मुकणे यांनी दिलेल्या जागेत त्यांच्या कालावधीपासून सुरू असलेले जव्हार येथील न्यायालय आता नव्या इमारतीत जाणार आहे

जव्हार न्यायालयाच्या इमारतीला अखेर मंजुरी
जव्हार : राजे यशवंतराव मुकणे यांनी दिलेल्या जागेत त्यांच्या कालावधीपासून सुरू असलेले जव्हार येथील न्यायालय आता नव्या इमारतीत जाणार आहे. त्याकरिता सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून नवीन इमारत बांधकामास प्रशासकीय मंजुरी मिळविणे व विधिप्राप्त करण्यासाठी वकील संघटनेने केलेला पाठपुरावा यशस्वी झाला आहे.
राज्यमंत्री नगरविकास विधी व न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांनी पत्र पाठवून विधी व न्याय विभागाकडून नवीन इमारत बांधण्याकरिता ३ कोटी २७ लाख ४१ हजार २२१ इतक्या रकमेला मान्यता मिळाल्याने जव्हार येथे लवकरच भव्य व अद्ययावत अशी न्यायालयाची इमारत उभी राहणार आहे. त्याबाबत वकील संघटनेने आनंद व्यक्त केला.
भूखंडावर गरीब कुटुंबातील ४१ जणांची घरे असल्याने त्यात अडचणी येत होत्या. जव्हार नगरपरिषदेच्या जागेत असलेली ही घरे हटविण्यात तत्कालीन नगराध्यक्ष दिनेश भट यांनी त्या कुटुंबावर अन्याय न होवू देता यशस्वी मध्यस्थी करीत त्यांना पर्यायी जागेत स्थलांतर केल्याने जागेची मुख्य अडचण दूर झाली. गेल्या अनेक वर्षांच्या आमच्या या प्रयत्नांना तत्कालीन जिल्हा सत्र न्यायाधीश सोनवणे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, तत्कालीन दिवाणी न्यायाधीश हस्तेकर, दिनेश भट, खा. चिंतामण वनगा, जव्हार वकील संघटना यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)