बलात्कार व खूनप्रकरणी जावेदला जन्मठेप
By Admin | Updated: September 10, 2015 03:48 IST2015-09-10T03:48:24+5:302015-09-10T03:48:24+5:30
कुर्ला येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी जावेद शेखला विशेष महिला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

बलात्कार व खूनप्रकरणी जावेदला जन्मठेप
मुंबई : कुर्ला येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी जावेद शेखला विशेष महिला न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
विशेष महिला न्यायाधीश वृषाली जोशी यांनी जावेदला जन्मठेप व ३० हजारांचा दंड ठोठावला. जावेदला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली होती. हे प्रकरण विरळातील विरळ नाही. या घटनेआधी जावेदविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही व हा खटला सुरू असताना जावेदचे कारागृहातील वर्तनही चांगले होते, असे नमूद करत न्यायालयाने जावेदला जन्मठेप ठोठावली.
ही शिक्षा ठोठावण्याआधी न्या. जोशी यांनी जावेदला आरोपीच्या पिंजऱ्यात बोलावले. बलात्कार व खूनासाठी तुला जन्मठेप ठोठावली जात आहे, असे सांगितले. कुर्ला-नेहरूनगर परिसरात २०१० मध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून केल्याचे प्रकार घडले होते़ अशा एकूण तीन घटना येथे घडल्या होत्या़ यामुळे येथील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली झाली होती़ जून २०१० मध्ये एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून झाल्याची घटना घडली़ त्यानंतर पोलिसांनी विभागातील तब्बल ६०० जणांची रक्त चाचणी करून यातील आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला होता़ अखेर अथक प्रयत्नाअंती जुलै महिन्यात जावेदला पकडण्यात पोलिसांना यश आले़
जावेदनेच हे कृत्य केले होते़ हे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे़ पीडित मुलगी त्याच्यासोबत होती, हे सांगणाऱ्या साक्षीदारांची साक्षही न्यायालयात झाली आहे, हे घरत यांनी न्यायालयाला पटवून दिले़