Join us  

Veer Savarkar: “राजनाथ सिंह गांधीजींकडून सावरकरांसाठी थोडी प्रतिष्ठा मिळवू पाहत आहेत”: जावेद अख्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 8:56 PM

Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीच्या पुस्तक प्रकाशनावेळी राजनाथ सिंह यांनी केलेल्या एका दाव्यावरून सुरू झालेला वाद अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याविषयीच्या पुस्तक प्रकाशनावेळी भाजप नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केलेल्या एका दाव्यावरून सुरू झालेला वाद अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येत असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहे. यात आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी उडी घेतली असून, राजनाथ सिंह यांनी केलेला दावा चुकीचा आणि खोटा असल्याचे म्हटले आहे. 

महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरूनच सावरकरांनी ब्रिटिशांना माफीनामा लिहून दिला होता, असा दावा राजनाथ यांनी केला होता. यानंतर देशभरात खळबळ उडाली आणि एकामागून एक राजकीय नेते मंडळींसह अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या. यानंतर आता जावेद अख्तर यांनी ट्विटरवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

गांधीजींकडून सावरकरांसाठी थोडी प्रतिष्ठा मिळवू पाहताहेत

सावरकरांनी ब्रिटिशांकडे केलेल्या माफीच्या दोन विनंत्या १९११ आणि १९१३ रोजी करण्यात आल्या. तेव्हा ते काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. त्यावेळी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यांनी १९१५ मध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. त्यामुळे सावकरकरांनी गांधीजींमुळे ब्रिटिशांकडे माफी मागितली हे खोटे आहे. सावकरकरांनी गांधींनी सांगितल्याने ब्रिटिशांकडे माफी मागितली हा दावा करून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गांधींकडून सावरकरांसाठी थोडी प्रतिष्ठा मिळवू पाहत आहेत. मात्र, याचा काहीही उपयोग होणार नाही, असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे. 

दरम्यान, भारत हा केवळ ४० किंवा ५० वर्षे जुना देश नाही. या देशाला ५ हजार वर्षांची दीर्घ परंपरा आहे. हजारो असे लोक आहेत, ज्यांनी या देशाच्या उभारणीत योगदान दिले आहे, मात्र ते लोक आज विसरले गेले आहेत. आपल्या देशात कोणतीही एक व्यक्ती राष्ट्रपिता होऊ शकत नाही. महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत, असे मला वाटत नाही. सावरकरांना राष्ट्रपिता घोषित करण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. मूळात राष्ट्रपिता ही संकल्पनाच मला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी याप्रकरणी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :विनायक दामोदर सावरकरराजनाथ सिंहजावेद अख्तरमहात्मा गांधी