Join us  

जाऊ दे रे गाडी... 'लालपरी'च्या जिल्हाबाह्य वाहतुकीला राज्य सरकारची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 4:14 PM

पूर्ण लॉकडाऊन काळात एसटीला दररोज २२ कोटी रुपयांचा फटका बसत होता. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यांतर्गंत वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

मुंबई - पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू असताना ‘एसटी’ला किलोमीटरमागे दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. आता कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. खर्च निघनेही कठीण होऊन बसले आहे. या परिस्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे एसटीपुढे मोठे आव्हान आहे. त्यातच, प्रवाशांकडून सातत्याने एसटीची जिल्हाबाह्य सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर, आज राज्य सरकारने आंतरराज्य एसटी सेवा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, उद्या 20 ऑगस्टपासून बससेवा सुरु होत आहे. 

पूर्ण लॉकडाऊन काळात एसटीला दररोज २२ कोटी रुपयांचा फटका बसत होता. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यांतर्गंत वाहतूक सुरू करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. एवढेही प्रवासी मिळविण्यासाठी एसटीला ‘आवाज’ मारण्याची वेळ आली आहे. तास-दीड तासात मिळेल तेवढे प्रवासी घेऊन एसटी मार्गस्थ होत आहे. मार्गात कुठेही थांबायचे नसल्याने थेट प्रवासी घेऊन बस निघत आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी आहे. त्यातच, आंतरजिल्हा बससेवा सुरु करण्याची मागणीही प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यास, राज्य सरकारने परवानगी दिली आहे. 

मिशन बिगेन अगेन 6 अंतर्गत राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केलं असून राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीकडून आणि वाहनांकडून प्रवाशांची होणारी लुटमार थांबण्यास आळा बसेल. गेल्या 4 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे, गरिबांच्या हक्काच्या लालपरीचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरिखीत झालं आहे. आता, सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊनचे नियम पाळून लालपरी पुन्हा रस्त्यावर लांब पल्ल्यासाठी धावणार आहे.

दरम्यान, आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्यानंतर सव्वाशे ते दीडशे किलोमीटरपर्यंत एसटीचा प्रवास होणार आहे. शंभर किलोमीटरमागे तीन हजार ५०० रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. निम्मे २२ प्रवाशाचे तिकीट भाडे १२५ रुपये झाल्यास दोन हजार ७५० रुपये एवढेच उत्पन्न येते. शंभर किलोमीटर मागे ७५० रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. जाण्या-येण्याच्या एका फेरीमागे १५०० रुपयांचा दणका एसटीला बसतो. आज २२ प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. आंतरजिल्हा प्रवासी मिळण्यासाठी एसटीच्या नाकीनऊ येणार आहे. त्यामुळेच या वाहतुकीचे मोठे आव्हान एसटीपुढे आहे. आंतरजिल्हा वाहतूक सुरू करणे आवश्यकच आहे. मात्र एसटीचे नुकसान होणार नाही, ही बाबही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. 

टॅग्स :बसचालककोरोना वायरस बातम्यासरकारमहाराष्ट्र