मुंबईच्या रुग्णालयांबाहेर ‘गोंगाट’
By Admin | Updated: April 27, 2017 00:20 IST2017-04-27T00:20:36+5:302017-04-27T00:20:36+5:30
मुंबई शहर-उपनगरातील प्रमुख सहा रुग्णालयांबाहेर ‘गोंगाट’ असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘आवाज’ फाऊंडेशनने मंगळवारी

मुंबईच्या रुग्णालयांबाहेर ‘गोंगाट’
मुंबई : मुंबई शहर-उपनगरातील प्रमुख सहा रुग्णालयांबाहेर ‘गोंगाट’ असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘आवाज’ फाऊंडेशनने मंगळवारी केलेल्या अभ्यासाच्या माध्यमातून शहर-उपनगरातील केईएम, वाडिया, शीव, लिलावती, होली फॅमिली आणि हिंदूजा या रुग्णालयांबाहेर १०० डेसिबलच्या आवाजाची नोंद करण्यात आली आहे. ‘जागतिक आवाज जागरुकता दिन’च्या पार्श्वभूमीवर या संस्थेने हा अभ्यास केला आहे.
या अभ्यासानुसार, माहिम येथील हिंदुजा रुग्णालयाबाहेर सर्वांत जास्त आवाज म्हणजे १००. ५ डेसिबल नोंदविण्यात आला. तर सर्वांत कमी म्हणजे ९५.१ डेसिबलची नोंद वांद्रे येथील लिलावती रुग्णालयाबाहेर करण्यात आली. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार, निवासी आणि शांतता क्षेत्रात दिवसा आवाजाची मर्यादा ५० ते ५५ डेसिबल इतकी असली पाहिजे. तर रात्रीच्या वेळीस ही मर्यादा ४० ते ४५ डेसिबल असणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे, रुग्णालयांच्या आजूबाजूचा परिसर हा ‘शांतता क्षेत्र’ असेल. परळ येथील वाडिया रुग्णालयाबाहेर ९९.६, होली फॅमिली रुग्णालयाबाहेर ९७.४, केईएम रुग्णालयाबाहेर १००.३, शीव रुग्णालयाबाहेर ९७.३ एवढे डेसिबल्सच्या आवाजाची नोंद करण्यात आली आहे. याविषयी, आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुलअली यांनी सांगितले की, आजही ध्वनी प्रदूषणाविषयी जागरुकता नसल्याने मुंबईत ही स्थिती आहे. याविषयी वाहतूक पोलीसांना माहिती असणे आवश्यक आहे, त्याकरिता त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. (प्रतिनिधी)