Join us  

Jammu & Kashmir: आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं!'- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 1:26 PM

मोदी सरकारनं 370 कलमातील तरतुदी शिथिल केल्या असून, जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा विशेष दर्जा काढून घेतला आहे.

मुंबई- मोदी सरकारनं 370 कलमातील तरतुदी शिथिल केल्या असून, जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा विशेष दर्जा काढून घेतला आहे. आता मोदी सरकार जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करणार आहे. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. जम्मू-काश्मीरला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा अस्तित्वात राहणार आहे. त्यानंतर आता राजकीय नेत्यांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या निर्णयासाठी मोदी आणि शहा यांचं अभिनंदन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि अटलजींचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे, यासाठी नरेंद्र भाई-अमित भाई यांचं मी अभिनंदन करतो. आजही देशात पोलादीपणा कायम आहे, हे मोदी सरकारनं जगाला दाखवून दिलं. आज आपल्या देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं आहे, मोदीनं सरकारनं देशाला जखडून ठेवणाऱ्या त्या बेड्या आज तोडून टाकल्या आहेत,  असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

पुढे ते म्हणाले, विरोध करणाऱ्यांनी राजकीय भूमिका बाजूला ठेवावी, हा निर्णय राजकीय पक्षापुरता मर्यादित नाही, सगळ्यांनी याचं स्वागत करावं. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता. सर्व देशानं हा आनंद साजरा करायला हवा. एक मोठं स्वप्न पूर्ण झालं हे फार महत्त्वाचं आहे. बाळासाहेब-अटलजींचं स्वप्न पूर्ण झालं आहे. देशासाठी ही नवी व्यवस्था आवश्यक आहे. येत्या दिवसांत देशाबरोबर खेळण्याची कोणी हिंमत करणार नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील. आता पाकलाच व्यापलं पाहिजे. देशातल्या हिंदूंच्या वतीनं ही या सरकारचं अभिनंदन करतोय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.   

टॅग्स :उद्धव ठाकरेकलम 370कलम 35-ए