जैनांनो, मुसलमानांच्या मार्गाने जाऊ नका- उद्धव ठाकरे
By Admin | Updated: September 10, 2015 10:05 IST2015-09-10T09:07:54+5:302015-09-10T10:05:54+5:30
धर्माच्या नावावर आतापर्यंत धर्मांध मुसलमानांची दादागिरी चालत आली आहे, पम जैन बांधवही त्याच मार्गाने जाणार असतील तर देवच त्यांचे रक्षण करो, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

जैनांनो, मुसलमानांच्या मार्गाने जाऊ नका- उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - पर्युषणच्या नावाखाली महाराष्ट्राला डिवचू नका, ‘जगा आणि जगू द्या’ याच मंत्राप्रमाणे ज्याला जे खायचे आहे त्याला ते खाऊ द्या. उगाच अहिंसेची धार्मिक लुडबूड करू नका असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जैन समाजातील नागरिकांना दिला आहे. पर्युषण पर्वातील मांसबंदीमुळे वातावरण तापलेले असतानाच 'जैनांनो, मुसलमानांच्या मार्गाने जाऊ नका' या सामनातील अग्रलेखात उद्धव यांनी मांसबंदीला कडाडून विरोध दर्शवला आहे.
या आधीही 'पर्युषण' पर्व होतच होती, पण कत्तलखाने व मांसाहारबंदीची थेरं तेव्हा कुणाच्या डोक्यातून निघाली नव्हती. मग हे सर्व आताच हट्टाने का केले जात आहे? असा सवाल अग्रलेखात विचारण्यात आला आहे. आतापर्यंत धर्माच्या नावावर धर्मांध मुसलमानांची दादागिरी चालत असे, पण मुसलमानांप्रमाणे ‘अल्पसंख्याक’ म्हणवून घेत जैन बांधवही त्याच धर्मांध मार्गाने जाणार असतील तर देव त्यांचे रक्षण करो. ९२-९३च्या दंगलीत शिवसेनेमुळेच जैन बांधवांच्या जीवांचे व त्यांच्या उद्योगधंद्यांचे रक्षण झाल्याची आठवणही या लेखातून करून देण्यात आली आहे. जैनांचा फालतू धर्मांधपणा असाच वाढत राहिला तर , त्यांनी भूमिपुत्रांशी दुश्मनी घेतली तर त्यांचे आर्थिक साम्राज्य चुलीत घालायला वेळ लागणार नाही असा दमही सामनातून देण्यात आला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात?
- आपल्या देशात कधी कोणत्या विषयाला उकळी फुटेल ते सांगता येत नाही. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत भयंकर दुष्काळ पडला आहे. लोकांना खायला अन्न नाही. भूकबळी होत आहेत. अशा वेळी मुंबई व आसपास राहणार्या ‘जैन’ बांधवांनी शाकाहार व मांसाहार यावर वाद निर्माण करून भूक चाळवली आहे. माणूस माणसाला खातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना ‘मांसाहार’ बंदीसाठी धार्मिक दांडिया खेळणे हे अमानुष आहे व एकप्रकारचा हिंसाचार आहे.
- आतापर्यंत धर्माच्या नावावर धर्मांध मुसलमानांची दादागिरी चालत असे, पण मुसलमानांप्रमाणे ‘अल्पसंख्याक’ म्हणवून घेत जैन बांधवही त्याच धर्मांध मार्गाने जाणार असतील तर देव त्यांचे रक्षण करो. कारण ९२-९३ सालात मुंबईत उसळलेल्या हिंसाचारात या गुजराती-जैन बांधवांचे रक्षण करण्याचे काम ‘हिंदू’ म्हणून मराठी बांधवांनी केले होते व धर्मांधांच्या हिंसेस हिंसेने उत्तर दिल्यामुळेच गुजराती-जैन बांधवांचे रक्षण झाले, त्यांचा जीव व इस्टेटी वाचल्या.
- फक्त कत्तलखान्यांतच हिंसा होते व पर्युषण काळात ‘मांसाहार’ रोखल्याने पुण्य लाभते असे कोणी सांगितले? हिंसा मनात असते व तुमच्या व्यवहारातही असते. या दोन प्रकारच्या हिंसाचारापासून आमचे जैन बांधव खरोखरच मुक्त आहेत काय? मुंबईच्या आर्थिक नाड्या ज्या बिल्डरांच्या ताब्यात आहेत ते ‘बिल्डर’ मोठ्या संख्येने आमचे जैन बांधवच आहेत. जमिनींच्या व घरांच्या करोडोच्या उलाढालीत ‘ब्लॅक ऍण्ड व्हाइट’चा खेळ जोरात सुरू असतो. ‘ब्लॅक’ मनी स्वीकारणे हे एकप्रकारे पाप किंवा हिंसाच आहे. पर्युषण काळात जैन बांधव काळ्या पैशांचे व्यवहार करणार नाहीत काय? मुंबईतल्या जुन्या चाळीतून गरीबांना, मराठी मध्यमवर्गीयांना पैशाच्या बळावर हुसकावून बाहेर काढले जात आहे व त्यांना हक्काचे घर देण्यासाठी रक्तशोषणाचे प्रकार होतात हासुद्धा हिंसेचा प्रकार आहे व पर्युषण काळात तो थांबेल असे वाटत नाही.