Join us

पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 03:05 IST

विलेपार्ले येथील जैन मंदिराचे उर्वरित बांधकाम ‘यथास्थित’ ठेवण्याचे आदेश असताना श्री १००८ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने पावसाळ्याच्या तोंडावर तात्पुरते शेड उभारण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विलेपार्ले येथील जैन मंदिराचे उर्वरित बांधकाम ‘यथास्थित’ ठेवण्याचे आदेश असताना श्री १००८ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने पावसाळ्याच्या तोंडावर तात्पुरते शेड उभारण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, न्यायालयाने ट्रस्टला त्यासंदर्भात महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश दिले.

महापालिकेने केलेल्या कारवाईविरोधात ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. गौरी गोडसे यांनी २७ जूनपर्यंत मंदिराचे उर्वरित बांधकाम ‘यथास्थित’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पावसाळा तोंडावर आल्याने तिथे प्रार्थना करण्यासाठी तात्पुरते शेड बांधण्याची परवानगी घेण्यासाठी ट्रस्टने न्या. अरिफ डॉक्टर यांच्या सुट्टीकालील एकलपीठापुढे याचिका दाखल केली. मात्र, या याचिकेला मंदिरासमोरील सोसायटीने आक्षेप घेतला. 

मंदिराचे उर्वरित बांधकाम ‘यथास्थित’ ठेवण्याचे निर्देश नियमित एकलपीठाने दिले आहेत. सुट्टीकालीन एकलपीठ याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी नियमित एकलपीठापुढेच याचिकेवर सुनावणी व्हायला हवी.  बांधकाम ‘यथास्थित’ ठेवण्याचे आदेश दिल्याने आणखी काही बांधकाम करू शकत नाही किंवा असलेले बांधकाम पाडू शकत नाही, असे सोसायटीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. ट्रस्टने या मुद्द्यावर पालिकेकडे जावे आणि पालिकेने त्याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

 

टॅग्स :जैन मंदीरविलेपार्लेमुंबई महानगरपालिका