संथारा निर्णयाविरोधात जैन समाजाची तीव्र निदर्शने
By Admin | Updated: August 25, 2015 05:08 IST2015-08-25T05:08:39+5:302015-08-25T05:08:39+5:30
राजस्थान उच्च न्यायालयाने जैन धर्मातील संथारा (सल्लेखना) व्रत व परंपरा ही आत्महत्या असल्याचा निर्णय दिल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात

संथारा निर्णयाविरोधात जैन समाजाची तीव्र निदर्शने
मुंबई : राजस्थान उच्च न्यायालयाने जैन धर्मातील संथारा (सल्लेखना) व्रत व परंपरा ही आत्महत्या असल्याचा निर्णय दिल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात जैन धर्मीयांनी मोठ्या संख्येने निदर्शने केली. शिवाय आपले म्हणणे स्पष्टपणे मांडण्यासाठी जैन मुनींसह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना निवेदन सादर केले. वाळकेश्वर येथील धर्मसभेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
वाळकेश्वर येथे यानिमित्ताने बाबू अमिचंद पन्नालाल जैन मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेत गच्छाधिपती आचार्य प्रद्युम्नविमल सुुरिश्वर महाराज, आचार्य हेमचंद्र सुरिश्वर महाराज, आचार्य कुशलचंद्र सुरिश्वर महाराज, मुनी भाग्यचंद्र विजय महाराज, डॉ. चंदनाश्रीजी महाराज आदी जैन संतांसह कनक परमार, अतुल वृजलाल शाह, मंजू लोढा, गिरीश शाह, किशन डागलिया आणि आमदार मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.
जैन समुदायाच्या म्हणण्यानुसार, हा धर्म अनादी काळापासून आहे. संथारा व्रत ही आत्महत्या नसून पवित्र व्रत व परंपरा आहे. जैन धर्मामध्ये संथारा ही आत्महत्या कधीही मानली जात नाही, मानली गेली नाही. संथारा ही उच्च परंपरा व पवित्र व्रत मानले जाते. ही जैन धर्मातील साधना आहे. शरीराच्या त्यागाचा उत्सव आहे. त्यामुळे हजारो वर्षांपासून चालत आलेल्या संथारा व्रताची परंपरा कायम व अबाधित ठेवण्यासाठी शासनाने अध्यादेश काढून या व्रताला घटनात्मक अधिकार द्यावा, असे म्हणणे उपस्थितांनी मांडले.
संथारावर हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर मुंबईत ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी जैन बांंधवांनी आपले व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवले होते. न्यायालयामार्फत सरकारने धर्मक्षेत्रात हस्तक्षेप करू नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली. भार्इंदर येथे याविरोधात एका शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात जैन आचार्यही सामील झाले होते. जैन समाजाच्या संलग्न असलेल्या विविध संस्थादेखील मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या निदर्शनामध्ये सहभागी झाल्या होत्या. दादर, अंधेरी, मालाड, बोरीवली, घाटकोपर, भांडुप, मुलुंड येथे ही निदर्शने झाली. (प्रतिनिधी)
धर्माच्या पालनाचा
सर्वांना हक्क
‘संथारा’ला निमित्त ठरवून कायद्याच्या माध्यमातून धर्मामध्ये हस्तक्षेप आम्ही सहन करणार नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माच्या परंपरेचे पालन करण्याचा हक्क आहे. त्यामुळे या बंदीला शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करू.
- राष्ट्रसंत आचार्य चंद्रानन सागर, विख्यात जैन संत
आयुष्यातील शेवटची साधना
जैन धर्मात संथारा ही हजारो वर्षांपासून सुरू असलेली प्रथा आहे. ही आयुष्यातील शेवटची साधना आहे. यामध्ये साधक अन्न व पाण्याचा त्याग करून परमेश्वराची आराधना करतो व आपला जीवन त्याग करतो. ही पवित्र प्रक्रिया आहे. याला आत्महत्या ठरविणे, हे धर्मविरोधी आहे.
- मंजू लोढा, ज्येष्ठ लेखिका
संथारा तर पवित्र प्रक्रिया
जैन धर्मात संथारा ही पवित्र प्रक्रिया आहे. तरीदेखील उच्च न्यायालयाने अशा प्रकारचा निर्णय दिल्याने जैन समाज नाराज आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ईश्वराचे स्मरण करून सत्कर्म करत राहणे म्हणजेच संथारा विधी आहे. याला कायद्याने रोखणे योग्य नाही.- अतुल वृजलाल शाह, ज्येष्ठ समाजसेवक