Join us
Daily Top 2Weekly Top 5

जैन समाज वैद्यकीय-कायदेशीर, अभ्यास समिती स्थापन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 07:28 IST

समितीशिवाय अन्य कोणीही भूमिका मांडणार नाही : ललित गांधी

मुंबई : अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्यावतीने एक अभ्यास समिती स्थापन करण्यात येणार असून, ती वैद्यकीय आणि कायदेशीर बाबींवर अभ्यास करून आपला सर्वकष अहवाल सादर करेल. त्यानंतर समाज सर्व कायदेशीर पर्यायांचा अभ्यास करून आपली भूमिका न्यायालयाच्या समितीपुढे मांडेल, असा निर्णय समाजाच्या राष्ट्रीय बैठकीत झाल्याचे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले.

महासंघाची ही महत्वपूर्ण बैठक बुधवारी सायंकाळी मुंबईत पार पडली. बैठकीला १२ राज्यांचे प्रमुख तसेच मुंबईतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जैन समाजाच्यावतीने २० सदस्यांची एक समिती कायदेशीर आणि शास्त्रोक्त बाजू तपासून, अभ्यासून मग समाजातील प्रमुख आचार्याचे यावर विचार घेईल आणि अंतिम अहवाल सादर करेल. सध्या आचार्य मुंबईतच चातुर्मासमध्ये व्यस्त असून, समिती त्यांच्याशी संपर्कात राहील. तसेच यापुढे समितीव्यतिरिक्त अन्य कोणीही या प्रकरणावर जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, अशी माहिती गांधी यांनी दिली.

न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची काळजी समाजाने घ्यावी. कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. कबूतरांचा जीव जाणार नाही, असा सर्वमान्य तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गांधी म्हणाले.

'राज ठाकरे तोडगा काढू शकतील'

कबुतरखान्यासाठी शस्त्र हाती घेण्याचे भाष्य करणाऱ्या जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी सौम्य भूमिका घेत 'शस्त्र' म्हणजे 'उपोषण' असल्याचे सांगितले. तसेच या विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याची आपली इच्छा असून, केवळ ते या विषयावर तोडगा काढू शकतील, असे मत व्यक्त केले. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या विषयावर आज कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

टॅग्स :मुंबई