Join us
Daily Top 2Weekly Top 5

जय हिंद कॉलेजमध्ये 'डेटूर'चा धमाका! राणी मुखर्जीची एन्ट्री अन् विद्यार्थ्यांचा कल्ला; पहिल्याच दिवशी मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:35 IST

मुंबईतील प्रसिद्ध 'जय हिंद कॉलेज'चा मास मीडिया विभागाचा वार्षिक महोत्सव 'डेटूर' यंदा आपल्या १७व्या वर्षात पदार्पण करत असून, पहिल्याच दिवशी या महोत्सवाने मुंबईतील तरुणाईला वेड लावले आहे.

मुंबईतील प्रसिद्ध 'जय हिंद कॉलेज'चा मास मीडिया विभागाचा वार्षिक महोत्सव 'डेटूर' यंदा आपल्या १७व्या वर्षात पदार्पण करत असून, पहिल्याच दिवशी या महोत्सवाने मुंबईतील तरुणाईला वेड लावले आहे. यंदाची 'द विंगमॅन शो' ही अनोखी थीम घेऊन आलेल्या या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलीवूडची 'क्वीन' राणी मुखर्जीने हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कथानकातील 'साइडकिक्स'चा सन्मान 

नेहमी मुख्य पात्रांभोवती फिरणारी प्रसिद्धीची वलये बाजूला सारून, पडद्यावरचे लाडके 'साइड हिरो' आणि 'विंगमन' यांना यंदा डेटूरने प्रसिद्धीच्या झोतात आणले आहे. २० जानेवारी रोजी या महोत्सवाची दणक्यात सुरुवात झाली. मुंबईतील २० हून अधिक नामवंत महाविद्यालयांच्या संघांनी आपल्या अफाट उर्जेने कॉलेजचा परिसर दणाणून सोडला.

राणी मुखर्जीच्या करिअरचे ३० वे वर्ष साजरे 

पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी! आपल्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने 'डेटूर'च्या मंचावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 'रो-टॉक्स' सोबतच्या या विशेष सत्रात राणीने आपल्या आठवणींना उजाळा दिला, गाणी गायली आणि विद्यार्थ्यांना यशाचे कानमंत्रही दिले. राणीला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले.

स्पर्धांचा रंगला थरार 'जॅम'च्या बादशहाने जिंकली मने 

पहिल्या दिवशी 'लिपसिंक बॅटल'पासून ते 'स्ट्रीट डान्स'पर्यंत अनेक चुरशीच्या स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली 'एस्केप रूम' हे आकर्षणाचे केंद्र ठरले. तर संध्याकाळी झालेल्या आयकॉनिक 'फॅशन शो'मध्ये ग्लॅमरचा तडका पाहायला मिळाला. या स्पर्धेचे परीक्षण श्रेया गुलाटी, वॅलेना आणि तानया गुप्ता यांनी केले.

महोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच मीडिया क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी 'जॅम' ही स्पर्धा खुली करण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षण खुद्द 'गॉड ऑफ जॅम' म्हणून ओळखले जाणारे होर्मुझ रगीना यांनी केले. विनोद, बुद्धिमत्ता आणि हजरजबाबीपणाचा हा खेळ पाहून प्रेक्षकही पोट धरून हसले. पहिल्याच दिवशी 'डेटूर'ने आपल्या नावाप्रमाणेच एक वेगळी आणि यशस्वी वाट चोखाळली आहे. येत्या काही दिवसांत हा उत्साह आणखी वाढणार असल्याचे आयोजकांनी म्हटले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rani Mukherjee's dazzling entry at Jai Hind College's 'Detour' fest!

Web Summary : Jai Hind College's 'Detour' fest kicked off with Rani Mukherjee. Students celebrated her 30 years in film with competitions and memories.
टॅग्स :महाविद्यालय