जागर युवामनाचा ठरला युवाशक्तीचा आविष्कार!
By Admin | Updated: November 23, 2015 01:25 IST2015-11-23T01:25:37+5:302015-11-23T01:25:37+5:30
१६ व्या कोकण मराठी साहित्य संमेलन शानदार वातावरणात मुंबईतील राजा शिवाजी विद्यालयात पार पडले. या संमेलनात अनेक साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल होती.

जागर युवामनाचा ठरला युवाशक्तीचा आविष्कार!
मुंबई : १६ व्या कोकण मराठी साहित्य संमेलन शानदार वातावरणात मुंबईतील राजा शिवाजी विद्यालयात पार पडले. या संमेलनात अनेक साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल होती. मात्र कोमसापच्या युवाशक्तीचा ‘जागर युवामनाचा’ हा एक वेगळा कार्यक्रम रसिकांची मने जिंकून गेला. कोमसाप पंचविशीत असताना त्या वयाच्याच युवकांचा त्यातील सक्रिय सहभाग हा विशेष लक्षणीय आहे.
साहित्यिक उपक्रमांमध्ये तरुण पिढी देखील सहभागी होत असल्याचे या निमित्ताने दिसून आले. यामिनी दळवी ,सौरभ नाईक, किरण यादव, सायली जाधव, आदित्य दवणे, लीना दातार, शशिकांत कोळी, गौरी सावंत, रोहिणी ढवळे या तरूणांनी सादर केलेल्या कविता विशेष लक्षणीय ठरल्या. ई- बुक्सकडे तरूण पिढी का वळतेय याची जाणीव करून देणारे प्रा. दीपा ठाणेकर लिखित व सिद्देश आयरे दिग्दर्शित पथनाट्य, कोमसापवर कवी उमेश जाधव याने रचलेले स्तुतीपर गीत अशा स्वरुपाचे हे कार्यक्रम युवकांमधील कलाविष्कार प्रकट करणारे होते.
कोमसापच्या युवाशक्तीची ही मोट बांधली आहे ती प्रा. दीपा ठाणेकर यांनी. विल्सन, रुईया, साठे, चेतना, सोमय्या, रामनिरंजन झुनझुनवाला, व्ही.पी.एम, एस.आय.डब्ल्यू.एस अशा अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांनी कोमसाप युवाशक्तीशी जोडले आहे. त्यांच्यातील कलागुणांना वाव देत साहित्याची आवड निर्माण करण्याचे कार्य त्यांनी सुरू केले आहे.
मुलांमध्ये काम करताना त्यांच्यातील संवेदनशीलता जाणून घेत, त्यांना पटेल, रुचेल अशा स्वरुपातील उपक्रम राबविण्याचे आव्हानात्मक कार्य त्यांनी कुशलतेने केल्यामुळेच युवाशक्तीचा उत्साह द्विगुणित झाला आहे. कोमसापच्या संमेलनाच्या निमित्ताने या युवाशक्तीने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी केली होती. या काळात झुनझुनवाला महाविद्यालयात काही सत्रांचे आयोजन त्यांनी केले. नाटकाचे जीवनातील महत्त्व, वाचन प्रेरणा दिन अशा स्वरुपाचे कार्यक्रम पार पडले.युवकांनी रचलेल्या कविता, त्यांनी केलेले कथाकथन , पथनाट्य, मुलांनी गायलेली भारूड - अभंग या रचनांवर आधारित कार्यक्रम घेण्यात आले. (प्रतिनिधी)
१मुंबई: मोबाइल आणि इंटरनेटच्या युगात मुलांना वाचनाची गोडी लावायची असेल, तर त्यांना पुस्तकाचा खुराक पालकांनी पुरवायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ बालसाहित्यिका विनिता ऐनापुरे यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दुसऱ्या दिवशी केले. यावेळी बाल-किशोरांसाठी ‘या बालांनो या रे या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी विनिता ऐनापुरे बोलत होत्या.२हल्ली टेक्नोलॉजीच्या युगात लहान वयातच मुलांच्या हातात फोन आणि लॅपटॉप येतात. यात ते इतके गुरफटून जातात की, त्यांना कशाचेही भान राहत नाही, आणि पुस्तकांची गोडी लागत नाही. बदलत्या काळाबरोबर नवीन गोष्टी आत्मसात करायला हव्याच पण पालकांनी मुलांना पुस्तक वाचनाची गोडी लावली पाहिजे. मोबाइल आणि लॅपटॉप सोबत त्यांना पुस्तकाचा खुराकही पालकांनी पुरवायला हवा, असेही ऐनापुरे म्हणाल्या.३उपस्थित बालसाहित्यिकारांनी मुलांना लहान बोधकथा सांगितल्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात मुलांचे गोष्टीकडे लक्ष किती आहे हे पाहण्यासाठी प्रश्न सुद्धा विचारले. या सत्राचा लाभ महाविद्यालातील विद्यार्थ्यांपासून ते अगदी आजीआजोबांनी सुद्धा घेतला. यावेळी बालसाहित्यकार सूर्यकांत मालुसरे, एकनाथ आव्हाड, ज्योती कपिले आदी मान्यवर उपस्थित होते.