जाधव- राणे राजकीय युध्द भडकणार

By Admin | Updated: August 17, 2014 22:35 IST2014-08-17T22:14:05+5:302014-08-17T22:35:07+5:30

आल्या निवडणुका : जाधवांना घेरण्याची राणेंची रणनीती

Jadhav-Rane will wreak political war | जाधव- राणे राजकीय युध्द भडकणार

जाधव- राणे राजकीय युध्द भडकणार

रत्नागिरी : राष्ट्रवादीचे कामगारमंत्री भास्कर जाधव व माजी खासदार नीलेश राणे यांच्यातील राजकीय वैर पुन्हा उफाळून आले आहे. लोकसभा निवडणुकीतील जाधव यांच्या दीपक केसरकर कनेक्शनमुळे राणे कुटुंबीय संतप्त आहे. जाधव यांनी केसरकरांना खतपाणी घातल्यानेच राजकीय घडी विस्कटली व पराभवाला सामोरे जावे लागल्याचा राग नीलेश राणे यांच्या मनात खदखदत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत जाधव-राणे राजकीय युध्दाचा भडका उडण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
राज्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात जागावाटपावरून अद्याप तणाव आहे. एकमेकांना आघाडी मोडण्याबाबत अप्रत्यक्ष इशारे दिले जात आहेत. त्यातच आता राणे विरुध्द जाधव युध्द भडकले तर कोकणात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. नीलेश राणे यांनी ज्या आवेशात गुहागरमध्ये जाऊन पत्रकारपरिषदेत आव्हान दिले, त्यामागे उद्योगमंत्री नारायण राणे यांची मोठी खेळी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेला जशी राणेंची कोंडी करण्यात आली, तशीच कोंडी गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांची करण्याचे संकेतच राणेंनी आपल्या घोेषणेने दिले आहेत.
केसरकरांच्या आडून जाधव यांनी आपले नुकसान व्हावे, यासाठी पाडापाडीचे राजकारण खेळल्याचा थेट आरोप नीलेश राणे यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या कृत्याची परतफेड करण्यासाठीच गुहागर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवून जाधव यांना धडा शिकविणार व त्यांची पैशांची मस्तीही जिरविणार असल्याचे वक्तव्य नीलेश राणे यांनी केले आहे. एकीकडे राणे यांचे खळबळ उडवून देणारे वक्तव्य आलेले असतानाच जाधव हेही तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे पुढे आले आहेत. नीलेश राणे हा छोटा माणूस आहे. राजकारणात लहान आहे. अशा वाह्यात पोराबाबत काय बोलणार, असे सांगत जाधव यांनी हा विषय झटकून टाकला असला तरी हा विषय संपलेला नाही.
जिल्ह्यातील विशेषत: रत्नागिरी, लांजा, राजापूर व चिपळूणमधील कॉँग्रेसचे कार्यकर्ते चिडलेले असून, भास्कर जाधव यांचा राजकीय बदला विधानसभा निवडणुकीत घ्यावा, यासाठी नीलेश राणे यांच्यावर दबाव आणला जात आहे.
नीलेश राणे समर्थकांची फळीच जाधव यांच्याविरोधात सक्रीय होत असून, त्याचा फटका बसणार नाही, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे जाधव यांना महागात पडू शकते. (प्रतिनिधी)
कामगारमंत्र्यांना कोंडीत पकडण्याची व्यूहरचना
गुहागरमधून निवडणूक लढवण्याच्या आपल्या या घोषणेची उद्योगमंत्री नारायण राणे यांना माहिती नसल्याचे नीलेश राणे यांनी सांगितले आहे. मात्र, प्रत्येक बाबतीत वडिलांचा सल्ला घेऊनच पुढे जाणाऱ्या नीलेश राणेंनी गुहागरबाबत केलेले वक्तव्य हे त्यांचे स्वत:चे असेल, असे राजकीय धुरिणांनाही वाटत नाही. यामागे भास्कर जाधव यांना विधानसभा निवडणुकीत घेरण्याची उद्योगमंत्री नारायण राणे यांची खास व्यूहरचना असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Web Title: Jadhav-Rane will wreak political war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.