Join us  

जे. जे. रुग्णालयात पोलीस, डॉक्टरांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 6:26 AM

बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची रांग, वॉर्डबाहेर ठाण मांडून बसलेले नातेवाईक आणि तपासणीसाठी वॉर्डमधून फिरत असलेले डॉक्टर्स असे काहीसे चित्र असणाऱ्या जे.जे. रुग्णालयाला शुक्रवारी सकाळपासूनच छावणीचे स्वरूप आले होते.

मुंबई : बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची रांग, वॉर्डबाहेर ठाण मांडून बसलेले नातेवाईक आणि तपासणीसाठी वॉर्डमधून फिरत असलेले डॉक्टर्स असे काहीसे चित्र असणाऱ्या जे.जे. रुग्णालयाला शुक्रवारी सकाळपासूनच छावणीचे स्वरूप आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास भायखळा कारागृहातल्या महिला कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात झाली आणि काहीच वेळात जे.जे. रुग्णालय परिसरात पोलिसांची वर्दळ पाहायला मिळाली.एकामागोमाग एक येणारी रुग्णवाहिका, प्रत्येक महिला कैदी रुग्णासोबत पोलीस आणि वरिष्ठ डॉक्टर-पोलीस अधिकाºयांची धावपळ जे.जे. रुग्णालयात दिसून आली. सायंकाळी ४च्या सुमारास जे.जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रुग्णालयात दाखल होण्याच्या कालावधीत महिला कैदी रुग्णांना उलट्या, जुलाब, अपचन, मळमळ असे त्रास होते होते. त्वरित त्यांच्यावर उपचार सुरू केले. २१, २३, २४ क्रमांकाच्या आपत्कालीन वॉर्ड्समध्ये या महिला कैदी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना ४८ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या महिला कैदी रुग्णांना झालेली बाधा ही दूषित पाणी, अन्नामधून झाल्याची शक्यता आहे, मात्र वैद्यकीय अहवालानंतर निश्चित कारण कळू शकेल. पत्रकार परिषदेत मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. विकार शेख यांनी सांगितले की, ही बाधा पावसाळी आजारांशी निगडित असण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना दिलेल्या प्रतिजैविकातून बाधा झाली ही शंका चुकीची आहे. या प्रतिजैविकांमुळे जुलाब व उलट्यांचा त्रास बंद होतो. त्यामुळे दूषित अन्न वा पाणी हेच असण्याची शक्यता आहे.>कारागृहातील पुरुष कैद्याला कॉलराभायखळा कारागृहातील पुरुष कैद्याला सोमवारी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालातून त्या कैदी रुग्णाला कॉलरा झाल्याचे निदान झाले असून त्यावर सीसीयू कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या रुग्णाच्या निदानानंतरच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कारागृहातील अन्य कैद्यांना ‘डॉक्सीसायक्लिन’ ही प्रतिजैविके देण्यात आली होती.

टॅग्स :जे. जे. रुग्णालय