जे. जे. रूग्णालयात रुग्णांसाठी स्वतंत्र कॅन्सर विभाग उभारणार- अमित देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:13 IST2020-03-04T06:13:06+5:302020-03-04T06:13:12+5:30
सर जे.जे. समूह रुग्णालयाला लवकरच दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत.

जे. जे. रूग्णालयात रुग्णांसाठी स्वतंत्र कॅन्सर विभाग उभारणार- अमित देशमुख
मुंबई : सर जे.जे. समूह रुग्णालयाला लवकरच दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर जे.जे. मध्ये कॅन्सर रुग्णांवरील उपचारांसाठी स्वतंत्र विभाग उभारण्यात येण्यात येईल. यासाठी आरोग्य विभागाकडून लवकरात लवकर धोरण आखण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले.
पीपल्स रिपब्लिकन पाटीर्चे सदस्य जोगेंद्र कवाडे यांनी सकाळच्या विशेष सत्रात जे.जे. रूग्णालयाबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. सहा महिन्यांपासून जेजे रूग्णालयातील ह्रदय शस्त्रक्रिया विभाग बंद आहे. तसेच सरकारने
केमिस्टची देयके न दिल्याने त्यांनीही औषध पुरवठा थांबविल्याचा मुद्दा कवाडे यांनी उपस्थित केला. यावर, मागील सरकारने नियमात बदल केल्याने तांत्रिक कारणांमुळे काही काळ केमिस्टची देयके रखडली होती. तसेच औषध पुरवठ्याअभावी कोणतीही शस्त्रक्रिया रखडली नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. हृदय शस्त्रक्रिया विभाग सुरू
असल्याचे सांगत आॅगस्ट २०१९ पासून दर महिन्याला होणाऱ्या हृदय शस्त्रक्रियांची आकडेवारीही त्यांनी
सादर केली. चर्चेत भाग घेताना आमदार विक्रम काळे यांनी जे.जे. रूग्णालयात कँसर विभाग सुरू करण्याची मागणी
केली. यावर, सरकार या सूचनेबाबत सकारात्मक आहे. जे. जे. रूग्णालयाला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून कॅन्सर विभाग सुरू करण्यात येईल. त्यासाठी विभागाकडून लवकरच धोरण आखण्याचे आश्वासन देशमुख यांनी
दिले.
वैद्यकीय शिक्षण विभागालाही अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.