सर्वपक्षीय सहकारमागचे असेही होते इंगीत
By Admin | Updated: May 8, 2015 22:49 IST2015-05-08T22:49:18+5:302015-05-08T22:49:18+5:30
पालघर व ठाणे या जिल्ह्यांची सामायिक मध्यवर्ती सहकारी बँक असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत

सर्वपक्षीय सहकारमागचे असेही होते इंगीत
ठाणे : पालघर व ठाणे या जिल्ह्यांची सामायिक मध्यवर्ती सहकारी बँक असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सगळ््याच पक्षांचे नेते सहकार पॅनलच्या रुपाने एकत्र आले कसे? असा प्रश्न संपूर्ण जिल्ह्याला पडला असला तरी त्या मागे येत्या वर्षा दीड वर्षात या बँकेचे होणारे विभाजन व त्यातून अस्तित्वात येणाऱ्या दोन नव्या जिल्हा बँकांच्या पुन्हा होणाऱ्या निवडणुका हे कारण दडलेले असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेले आणि खासदार झालेले कपिल पाटील हे ठाणे जिल्हा बँक भाजपाच्या दावणीला बांधू शकतात काय? याचीही चाचपणी भाजपाला करायची होती. ती देखील बँकेच्या विभाजनापूर्वी! जर कपिल पाटील हे या बँकेवर या निवडणुकीत दणदणीत बहुमत स्थापित करू शकले असते तर, तिचे तात्काळ विभाजन झाले असते. परंतु, आमदार हितेंद्र ठाकूर व त्यांची बहुजन विकास आघाडी ही एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मैत्रीचा हवाला देत सरकारला पाठिंबा देते. आणि दुसरीकडे भाजपचे खासदार कपिल पाटील आणि मित्रपक्ष शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलच्या विरोधात वसई विकास पॅनल उभे करून झुंज देते ही बाब भविष्यात ठाणे जिल्हा बँकेचे विभाजन झाल्यानंतर पालघर जिल्हा बँकेवर आम्ही आमचेच वर्चस्व निर्माण करू या ठाकूर गटाच्या भूमिकेचे द्योतक आहे. ठाणे जिल्हा बँक भले तुम्ही ताब्यात घ्या पण नव्या पालघर जिल्हा बँकेवर ती होईल तेव्हा आम्ही सर्वस्व पणाला लाऊ त्यात मैत्री असणार नाही असा इशाराही ठाण्यातल्या नेत्यांना वसई विकासच्या रूपाने दिला गेला आहे. सगळ््या पक्षांचे नेते सहकारच्या निमित्ताने एकत्र येण्यामागचे आणखी एक कारण हेच आहे की, वर्षा दोन वर्षांत जिचे विभाजन होणार आहे त्या बँकेतील औट घटकेची सत्ता मिळविण्याकरिता लढायचे कशासाठी आणि पाण्यासारखा पैसा उधळायचा कशासाठी? विभाजन झाल्यानंतर होणाऱ्या निवडणुकीकरिता हा ‘स्टॅमिना’ सगळ््या पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी योजनापूर्वक राखून ठेवला आहे. पालघरचे संपर्कमंत्री सवरा असले तरी त्यांचा आणि भाजपाचे आमदार पास्कल धनारे यांचा फारसा प्रभाव जिल्हा बँक निवडणुकीत जाणवला नाही व यापुढेही तो जाणविण्याची शक्यता नाही. त्यामुळे ठाकूर गटाला, त्यांच्या बविआला बँक विभाजनानंतर मोकळे रान मिळणार आहे. (विशेष प्रतिनिधी)