Join us
Daily Top 2Weekly Top 5

बीकेसी : नुसतीच सोन्याची लंका; रोज १ ते २ तास जीवघेणा प्रवास, जाण्यायेण्यातच वाया जातोय वेळ आणि पैसा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 09:35 IST

कुर्ला किंवा वांद्र्यावरून बीकेसीतील ऑफिस गाठायला नोकरदारांना ४५ मिनिटे ते एक तासांचा कालावधी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रशस्त आणि वळणदार रस्ते, चकाचक कॉर्पोरेट कार्यालये, सुबक आणि देखण्या इमारती, कॉर्पोरेट कार्यालयांना पूरक ठरतील अशी चटपटीत नामांकित ब्रँड्सची खाद्यगृहे... वांद्रे कुर्ला संकुलाचे (बीकेसी) हे वातावरण कितीही मनोहारी वाटत असले तरी या ठिकाणी काम करणाऱ्यांच्या दृष्टीने तिथे जाणे म्हणजे शिक्षाच आहे. बीकेसीत जाण्यासाठी नोकरदारांना दररोज वाहतूककोंडीच्या दिव्याला सामोरे जावे लागते. या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे ही वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. कुर्ला किंवा वांद्र्यावरून बीकेसीतील ऑफिस गाठायला नोकरदारांना ४५ मिनिटे ते एक तासांचा कालावधी लागत आहे. त्यात त्यांचा पैसा वाया जात असल्याने बीकेसी म्हणजे नुसतीच सोन्याची लंका ठरत आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये (बीकेसी) गेल्या दोन-अडीच वर्षांत मोठ्या संख्येने सरकारी कार्यालयांसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बँका व कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये उभी राहिली आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी कुर्ला आणि वांद्रे स्थानकातून बीकेसी गाठताना  तारेवरची कसरत करावी लागते. वांद्र्याहून पूर्व द्रूतगती महामार्ग पार करून, तर कुर्ल्याहून लाल बहादूर शास्त्री मार्ग पार करून बीकेसी गाठावे लागते. नेमके याच ठिकाणी मोठी कोंडी होत आहे.

- कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान ३१० क्रमांकाची बेस्ट बस सेवा देत असून, या बसची वारंवारता कमी आहे. त्यामुळे अर्ध्या तासाच्या फरकाने सुटणाऱ्या या बसमधून प्रवाशांना अक्षरश: लोंबकळत प्रवास करावा लागतो आहे.

- कुर्ला रेल्वे स्थानकातून सकाळी ८ ते ११ दरम्यान ३१० क्रमांकाच्या बसमधील गर्दी बघूनच प्रवाशांना धडकी भरते. यावर उपाय म्हणून प्रवासी शेअर रिक्षाकडे धाव घेतात. मात्र, रिक्षाची रांग ५० मीटर लांब असते. त्यामुळे १५ ते २० मिनिटे प्रवाशांना रांगेत ताटकळत राहावे लागते.

- कुर्ला रेल्वे स्थानकापासून बीकेसी जंक्शनपर्यंतच्या रस्त्याचे पदपाथ भंगारवाल्यांनी व्यापले असून, चालण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यात वाहनांच्या दुतर्फा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे.

- बीकेसीमधून कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंतचा प्रवास मोजून १५ मिनिटांचा आहे. मात्र, कोंडीमुळे स्थानक गाठण्यासाठी प्रवाशांना ४५ मिनिटांहून अधिक वेळ लागत आहे. हा ४५ मिनिटांचा वेळ वाचविण्यासाठी प्रवासी कुर्ला डेपोच्या सिग्नलवर उतरून बाजार मार्गाने रोज कुर्ला रेल्वे स्थानक गाठत आहेत.

- वांद्रे रेल्वे स्थानकापासून कौटुंबिक न्यायालयापर्यंतचा प्रवास १० मिनिटांचा आहे. मात्र, रिक्षा पकडणे प्रवाशांना गैरसोयीचे होते. वांद्रे रेल्वे स्थानकापासून म्हाडापर्यंत असलेला स्कायवॉक तोडून कित्येक वर्षे झाली. मात्र, अद्याप हा स्कायवॉक बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे नादुरुस्त पदपाथवरून भर गर्दीत प्रवाशांना स्थानक गाठावे लागत आहे.

- वांद्रे रेल्वे स्थानकापासून कोर्टापर्यंतच्या पदपाथची रया गेली आहे. पदपाथवरच्या लाद्या उखडल्या आहेत. सांडपाणी वाहत आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथ काबीज केले आहेत. त्यामुळे येथे चालायला जागा नाही.

बीकेसीमध्ये आहे तरी काय ?म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, जिओ, कौटुंबिक न्यायालय, एफडीए, जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण, महानिर्मिती, पारेषण, नाबार्डसोबतच कॉर्पोरेट कार्यालये बीकेसीमध्ये आहेत. भारतनगरसारखी मोठी वस्ती बीकेसीमध्ये आहे. या सगळ्याचा भार बीकेसीवर पडतो आहे. मात्र, हा वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधी काहीच बोलत नाहीत, अशी खंत आता व्यक्त होत आहे.

- बुलेट ट्रेनच्या कामासाठी मोठे बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र, बॅरिकेटने फूटपाथ व्यापले असून, येथे मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य आहे. पदपाथलगतचा रस्त्याचा भाग सखल झाल्याने येथे पावसाळ्यात वाहनचालकांना फटका बसतो आहे.

टॅग्स :मुंबईवाहतूक कोंडी