Join us  

वडाळ्यातून कल्याण थेट मेट्रो प्रवास होणार शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 3:17 AM

प्रवाशांचा प्रवास होणार गतिमान; मेट्रो -४ आणि ५ मार्गिका एकमेकांना जोडणार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यकारी समितीची बैठक मंगळवारी पार पडली. ही बैठक समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीमध्ये प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्गिकांसंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मेट्रो बांधकामामध्ये वडाळा-घाटकोपर-ठाणे-मुलुंड- कासारवडवली मेट्रो-४ आणि ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ मार्गिकांच्या जोडणीचाही समावेश आहे. यामुळे मेट्रो मार्गिकांनी प्रवास करणार्या प्रवाशांचा प्रवास गतीमान होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.प्राधिकरणाच्या मंगळवारच्या बैठकीमध्ये विविध महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मेट्रो-५ मार्गिकेच्या स्थापत्य आणि स्थानकांच्या बांधकामासाठी निविदा मंजूर करण्यात आली, तर मेट्रो -५ आणि मेट्रो-९ मार्गिकेच्या बांधकामाच्या अंमलबजावणीसाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात आली. मेट्रो भवन आणि परिचालन नियंत्रण केंद्रासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली. मे. अ‍ॅफकॉंस इंफ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीची मेट्रो-५ मार्गिकेच्या बांधकामासाठी नेमणूक करण्यात आली आहे.यामध्ये मेट्रो-४ आणि मेट्रो-५ या दोन्ही मार्गिकांच्या जोडणीचा समावेश असल्याचे एमएमआरडीएमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बालकुम नाका, आणि कापुरवाडी अशी स्थानके कंत्राटदारामार्फत बांधण्यात येणार आहेत. तसेच समितीने मे. सिस्ट्रा फ्रांस, मे कन्सल्टींग एन्जिनिअर्स ग्रुप लि. आणि मे. सिस्ट्रा एम.व्ही.ए. कन्सल्टींग इंडीया प्रा.लि. या समुहाची साधारण सल्लागार म्हणून नेमणूक केली. कल्यान ते भिवंडी मेट्रो-५ आणि दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो-९ मार्गिकेच्या स्थापत्य कामाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.मुंबईभर जाळेमुंबई आणि महानगर परिसरामध्ये लवकरात लवकर मेट्रोचे जाळे उभारण्याचा राज्य शासनाचा मानस आहे,हेच समितीच्या पुढच्या निर्णयामुळे सिद्ध होते. समितीने एपिकॉंस कन्सल्टंट प्रा.लि.यांची नेमणूक मेट्रो भवन आणि परिचालन नियंत्रण केंद्रासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. यावेळी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए.राजीव असे म्हणाले, सर्व निर्णय प्रामुख्याने मेट्रो संबंधीत आहेत. एक किंवा दोन मेट्रो नव्हे तर मेट्रोचे जाळे निर्माण करण्याची खरी गरज आहे. एकूण वाहतूक कोंडी, दुषित हवा आणि पर्यावरणाचा घसरता दर्जा पाहता परिणामकारक अशा सार्वजनिक वाहतूक प्रणालीची आपल्याला आवश्यकता आहे. त्यामुळे वाहनधारक आपापली वाहने घरी ठेऊन मेट्रो सारख्या आरामदायी वाहतूक सेवेकडे वळतील, असे राजीव यावेळी म्हणाले.

टॅग्स :मेट्रो