Join us  

नवीन घर खरेदीदारांची डोकेदुखी कमी होणार ! सर्व सुविधांचा तपशील देणे विकासकांसाठी बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 10:11 AM

नवीन गृहनिर्माण प्रकल्पांतील सुविधा, सुखसोयीतील अनिश्चितता संपविण्यासाठी महारेराने पुढाकार घेतला आहे.

मुंबई : नवीन गृहनिर्माण प्रकल्पांतील सुविधा, सुखसोयीतील अनिश्चितता संपविण्यासाठी महारेराने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, आता प्रत्यक्षात आश्वासित सुविधा आणि सुखसोयी घर घेणाऱ्या ग्राहकांना कधी उपलब्ध होणार? यांचा तपशील देणे बिल्डरला बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे घर खरेदीदारांची डोकेदुखी आता कमी होणार आहे.

नवीन गृहनिर्माण प्रकल्पाच्या विक्री करारात प्रकल्पाचे बांधकाम, आतील-बाहेरील कामे, प्रकल्प उभारणीच्या आणि पूर्ततेच्या टप्पेनिहाय विविध तारखा, त्यानुसार पैसे भरण्याचे वेळापत्रक, घरांची किंमत, घर हस्तांतरणाची तारीख, त्यास विलंब झाल्यास बिल्डरने द्यायचा दंड आणि ठरल्यानुसार पैसे भरण्यास विलंब झाल्यास घर खरेदीदाराने द्यायचे व्याज, असा तपशील विक्री करारात असतो. या करारात मात्र प्रकल्पाच्या सार्वजनिक क्षेत्रात, इमारतीत, इमारतीच्या सार्वजनिक क्षेत्रात द्यायच्या आश्वासित सुविधा रहिवासी आणि त्यांचे कुटुंबीय यांना वापरासाठी कधी उपलब्ध होणार? त्याचा आकार काय राहील? याचा कुठलाही तपशील नसतो.

याचा तपशील तारखेसह देणे आवश्यक-

विक्री करार करताना गृहनिर्माण प्रकल्पाच्या सार्वजनिक क्षेत्रात, इमारतीत, इमारतीच्या सार्वजनिक क्षेत्रात आणि प्रकल्पाच्या एकूण रेखांकित क्षेत्रात (प्रोजेक्ट लेआऊट) द्यायच्या तरणतलाव, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, नाट्यगृह, सोसायटीचे कार्यालय, व्यायामशाळा, स्क्वॅश कोर्ट या सुविधा इमारतीतील रहिवासी आणि त्यांचे कुटुंबीय यांना वापरासाठी कधी उपलब्ध होणार? त्याचा आकार काय राहील? याचाही तपशील तारखेसह देणे आता बंधनकारक आहे.

अपवादाने असला तर या सुविधा आणि सुखसोयी कधी उपलब्ध होणार याचा तपशील नसतो. त्यामुळे अनेकदा घराची नोंदणी करताना आश्वासित सुविधा, सुखसोयी राहायला गेल्यानंतर आश्वासनानुसार उपलब्ध असतात, असे नाही.

खरेदीदारांची फसवणूक होवू नये आणि बिल्डरांची जबाबदारी वाढून पारदर्शकतेसाठी महारेराने विक्री करारात ही बाब जोडपत्रात सर्व तपशिलासह देणे बंधनकारक केली आहे.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग