Join us

वापरलेली दुचाकी घेत असाल तर सावधान ! आरोपींच्या कबुलीवरून रॅकेट उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 11:59 IST

एखादी व्यक्ती दुचाकी बाजारभावापेक्षा कमी भावात देत असेल तर ती चोरीची असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई : शहरात दुचाकी चोरीचे सत्र अव्याहत सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक चिंताग्रस्त झाले असून, दुचाकी उभी करायची तरी कुठे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. दरम्यान, चोरीच्या त्या दुचाकी कवडीमोल किमतीत विकल्या जात असल्याचे आरोपींच्या कबुलीवरून उघड झाले आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती दुचाकी बाजारभावापेक्षा कमी भावात देत असेल तर ती चोरीची असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातून दुचाकी चोरीचे प्रकार सर्रास झाले आहेत. दुचाकी चोरीला आळा घालण्यासाठी नाकाबंदी करण्यात येत असून, सखोल तपासणीही करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. असे असतानाही दुचाकी चोरीच्या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळे दुचाकी चोरांचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. दुचाकी चोर परजिल्ह्यातून येऊन पसार होत असल्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चोरीच्या दुचाकी सर्वात जास्त ग्रामीण भागात नेऊन तेथे अत्यंत कमी किमतीमध्ये विकल्या जातात. कोण पाहणार, ही वृत्ती येथे घात करते.

मौजमजेसाठी चोरी...

चोरट्यांकड़ून मौजमजेसाठी चोरी केली जात असल्याचे वेळोवेळी चौकशीतून समोर आले आहे. मुंबईत आतापर्यंत दाखल वाहन चोरीच्या घटनांपैकी १,५९९  गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. यात आतापर्यंत वेगवेगळ्या टोळ्यांंची, चोरांची पोलिसांनी धरपकड सुरू आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

रस्त्यावरील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकड़ून गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच सर्व आस्थापनाबाहेर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश पोलिसांकड़ून देण्यात आले आहेत. जेणेकरून गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.