खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट बंधनकारक करण्याबाबत वटहुकूम काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:06 IST2021-05-28T04:06:31+5:302021-05-28T04:06:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयांना स्वतःचा ऑक्सिजन प्लांट उभारणे बंधनकारक करण्यासाठी वटहुकूम जारी करण्यासंदर्भात विचार ...

खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट बंधनकारक करण्याबाबत वटहुकूम काढा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयांना स्वतःचा ऑक्सिजन प्लांट उभारणे बंधनकारक करण्यासाठी वटहुकूम जारी करण्यासंदर्भात विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी केली.
न्यायालयाने याआधी खासगी रुग्णालयांचा स्वतःचा ऑक्सिजन प्लांट असणे आवश्यक आहे आणि ही ती वेळ आहे, असे आदेशात म्हटले होते. या आदेशाचा हवाला देत न्या. अमजद सय्यद व न्या. गुरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले की, यापूर्वी न्यायालयाने खासगी रुग्णालयांना स्वतःचा ऑक्सिजन प्लांट उभा करण्यासाठी किती खर्च येईल, तसेच किती जागा लागेल, याची माहिती मागवली होती.
महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले की, सध्या राज्य सरकारकडे ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे. रुग्णालयांना स्वतःचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी एक ते दोन आठवडे लागतील. एक मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी अंदाजे एक कोटी रुपये खर्च येईल, असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले.
कायद्यात सुधारणा करण्याऐवजी तुम्ही (राज्य सरकार) वटहुकूम जारी करण्याचा विचार करा. त्यामुळे वेळ वाचेल,'' असे म्हणत न्यायालयाने २ जूनपर्यंत याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.