Join us  

...तर राम मंदिर हा 15 लाख रुपयांसारखाच जुमला आहे काय ?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 4:54 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे.

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. मोदी सरकारनं प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार असल्याचं सांगितलं होतं, पण ते काही झालं नाही. आता राम मंदिर हासुद्धा 15 लाख रुपयांसारखा जुमला आहे काय ?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. फक्त निवडणुकीच्या काळात भाजपाला राम मंदिराची आठवण येते. निवडणूक झाल्यानंतर भाजपा राम मंदिराची घोषणा विसरतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.सामनातूनही उद्धव ठाकरे भाजपाला लक्ष्य करत असतात. सरकार फक्त निवडणुका जिंकण्यामागे लागले आहे. राज्यकर्ते निवडणूकग्रस्त झाले की प्रशासन, पोलीसही ढिले पडतात व त्यामुळे अतिरेक्यांचे फावते. कश्मीरात अशांतता आहेच, पण शांत झालेले पंजाब पुन्हा पेटू नये. निवडणुका येतील आणि जातील, पंजाबवरचा घाव हा देशावरचा घाव हे राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. काँग्रेस पक्षाने गेल्या 70 वर्षांत काहीच केले नाही हे मोदींचे म्हणणे मान्य, पण पंजाबातील रक्तपाताकडे गांभीर्याने पहा इतकेच आम्हाला गंभीरतापूर्वक सांगायचे आहे'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली होती. अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेची जय्यत तयारीशिवसेना पक्षप्रमुख येत्या 24 नोव्हेंबरला दुपारी खास विमानाने अयोध्येला जाणार आहेत. चलो अयोध्येचा नारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केला होता. त्यानुसार 25 नोव्हेंबरला चलो अयोध्या असा नारा देत शिवसेनेने राज्यात जोरदार शक्ति प्रदर्शन करत जय्यत तयारी सुरू केली आहे. सोशल मीडिया तसेच होर्डिंग्ज यांच्या माध्यमातून तसेच शिवसेनेचे विभागप्रमुख,जिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख आपल्या भागात शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांचा बैठका घेत त्यांना उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा तपशील आणि त्यांच्या भागात त्यांनी कशाप्रकारे महाआरती आयोजित करावी याचा सविस्तर तपशिल त्यांना सांगत असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरे