Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या मुलाचे प्ले स्कूल, नर्सरी अधिकृत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 12:50 IST

लहानग्यांना मिळतेय चुकीची वागणूक

मुंबई : मागील काही वर्षांत शहर, उपनगरात प्ले स्कूल आणि नर्सरींचे प्रमाण वाढते आहे. अनेकदा या ठिकाणी लहानग्यांना मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीचे पडसादही सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून समोर येत आहेत. त्यामुळे या गल्लोगल्लीच्या प्ले स्कूल, नर्सरीवर यंत्रणाचा अंकुश असण्याची गरज अधोरेखित झाली आहे. लवकरच नव्या शैक्षणिक धोरणातील तरतुदींनुसार, प्ले स्कूल, नर्सरी अशा शालेयपूर्व शिक्षण संस्थांना अधिकृत परवानगी बंधनकारक असणार आहे. 

पूर्व प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांनी लिहायला, वाचायला शिकावे, असे बिलकुल अभिप्रेत नाही; तर मुलांना एकमेकांबरोबर राहायला शिकविणारे, सामाजिक जाण निर्माण करणारे हे शिक्षण असावे. परंतु, आजकाल वेगवेगळ्या प्रकारे पालकांना भुरळ पाडून अनेक खासगी संस्था दिशाभूल करत आहेत. मुळात पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी स्वतंत्र धोरण असणे अपेक्षित आहे, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी मांडले आहे.

पूर्व प्राथमिकसाठी परवानगीशिक्षण विभागाने अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच यापुढे प्ले ग्रुप, नर्सरी, बालवर्ग, केजी आदी वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

कोट्यवधींची उलाढालप्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजीत मुबलक पैसा मिळतो, अर्थात तो मिळविला जातो. अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांना आधी डोनेशन दिले तरच प्रवेश सुकर होतो. काही शाळा तर प्रवेशाआधीच डोनेशन तर घेतातच शिवाय पालक आणि पाल्यांच्या मुलाखतीही घेतात. प्री-प्रायमरीत या उद्योगातून मागील काही वर्षात नोटांचा वर्षावच होत असल्याने सध्या गल्लोगल्ली, शहरातील, परिसरातील मिळेल त्या भागात, जागेत गोंडस नावाखाली प्ले ग्रुप, नर्सरी, केजी अशा शाळांचे पेव फुटले आहे, या सर्व संस्थांचा बाजार मागील काही वर्षांत कोट्यवधींवर पोहोचला आहे.

काय आहे नियमावली ?खासगी पद्धतीने नर्सरी, केजी, प्ले ग्रुप असे वर्ग घेऊन शाळा चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. पण यापुढे अशा शाळांवर शिक्षण विभागाचे लक्ष असणार आहे, अशा शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाची परवानगी घेणेदेखील बंधनकारक असणार आहे. मुलांना वयानुसार, मानसिक विकासासानुसार शिक्षण देणे अनिवार्य असणार असल्याचा नवीन शैक्षणिक धोरणानुसार निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच शाळांमध्ये विद्यार्थी मूल्यमापनदेखील होणार असल्याची माहिती शिक्षण अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण असे हवे शिक्षण, शाळेची गोडी लावणारे कृती, खेळातून अभ्यासाची आवड निर्माण करणारे दैनंदिन चांगल्या सवयी लावणारे अक्षर, अंक, रंग, आकार ओळख सर्वांगीण विकासास मदत करणारे भाषेची गोडी लावणारे

 

टॅग्स :मुंबई