Join us  

मिलिंद देवरा यांच्या निर्णयाला उद्धव ठाकरे जबाबदार? काँग्रेस नेत्याचे विधान, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 3:52 PM

Milind Deora Left Congress Party: दक्षिण मुंबई लोकसभा जागेवर ठाकरे गट ठाम होता. याबाबत राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याची मिलिंद देवरा यांची इच्छा होती.

Milind Deora Left Congress Party: गेल्या अनेक दिवसापासूनच्या चर्चांना अखेर पूर्णविराम देत मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. एकीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होत असून, दुसरीकडे मिलिंद देवरा यांनी दिलेल्या राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावरून काँग्रेस नेत्यांनी मिलिंद देवरा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मात्र, मिलिंद देवरा यांच्या पक्षाला रामराम करण्याच्या निर्णयासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत का, अशी चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

मी माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या प्रकरणाचा शेवट करत आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. काँग्रेसशी माझ्या कुटुंबाचे ५५ वर्षांपासूनचे संबंध आहेत जे मी आज संपवत आहे. इतकी वर्षे मला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसमधील नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे, अशी पोस्ट एक्सवर शेअर करत मिलिंद देवरा यांनी आपला निर्णय जाहीर केला. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

ठाकरे गटाचा दक्षिण मुंबई लोकसभा जागेवर दावा

मिलिंद देवरा यांच्या पक्ष सोडण्याच्या घोषणेची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ठरवली होती, असा आरोप करत, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, मिलिंद देवरा शुक्रवारी त्यांच्याशी फोनवर बोलले होते. मुंबई दक्षिण लोकसभा जागेवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाने दावा केला आहे. याबाबत राहुल गांधींशी बोलायचे आहे, असे देवरा यांचे म्हणणे होते. मिलिंद देवरा आणि त्यांचे वडील मुरली देवरा हे दोघेही दक्षिण मुंबईतून खासदार राहिले आहेत, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. तसेच मिलिंद देवरा म्हणाले की, मला काळजी आहे की, ही सध्याची शिवसेना ठाकरे गटाची जागा आहे. मला राहुल गांधींना भेटून त्यांना या जागेबद्दल सांगायचे होते आणि राहुल गांधींशी याबद्दल बोलू इच्छित होते, असे जयराम रमेश यांनी सांगितले.

दरम्यान, दक्षिण मुंबईची जागा आमचीच आहे, अरविंद सावंत दोनदा निवडून आले आहेत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तर दुसरीकडे, मिलिंद देवरा शिवसेनेत आल्यावर शिंदे गट हा दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आग्रही असू शकतो. परंतु, भाजपा हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. यामुळे भाजपा आणि शिंदे गटात दक्षिण मुंबई मतदारसंघावरून संघर्ष होण्याची चिन्हे असल्याचे बोलले जात आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपा आणि शिंदे गट उभयतांनी दावा केल्यास एकाला माघार घ्यावी लागेल. 

टॅग्स :काँग्रेसशिवसेना