Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरेत आणखी एका कृत्रिम तलावाची गरज आहे का? तज्ज्ञांनी निर्णय घ्यावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 12:55 IST

आरे वसाहतीत गणेश विसर्जनासाठी आणखी एक कृत्रिम तलाव तयार करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

मुंबई :  

आरे वसाहतीत गणेश विसर्जनासाठी आणखी एक कृत्रिम तलाव तयार करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने संजय गांधी नॅशनल पार्कच्या देखरेख समितीला आरेमध्ये आणखी एका कृत्रिम तलावाची आवश्यकता आहे का, याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आपला हेतू नाही, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. आरे तलावात किंवा आरे वसाहतीतच गणेश विसर्जनासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी करणारी याचिका विश्व हिंदू परिषदेचे विभाग सचिव राजीव चौबे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी  होती. चौबे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल सिंग यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. ‘गेल्या बुधवारपासून आरेच्या कृत्रिम तलावात गणपतींचे विसर्जन करण्यात येत आहे. आता आणखी गणपतींचे विसर्जन करण्यात येईल. आरे तलावात विसर्जनाची परवानगी मागत नाही. परंतु, आणखी एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी आहे,’ असा युक्तिवाद सिंग यांनी केला

विसर्जनामुळे प्रदूषणात वाढआरे वसाहतीतील नैसर्गिक तलावात गणेश विसर्जन होत असल्याने तेथे प्रदूषण वाढत आहे व दुर्मीळ प्रजातींना धोका पोहोचत असल्याचे म्हणत वनशक्ती या एनजीओने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने आरेच्या सीईओंकडून स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर सीईओंनी दरवर्षी येथे विसर्जनाला परवानगी देण्यात येत असून, यंदा परवानगी देणार नसल्याचे न्यायालयाला गेल्या सुनावणीत सांगितले होते.

कृत्रिम तलावाव्यतिरिक्त आरेमध्ये विसर्जनासाठी सहा फिरते ट्रक ठेवले आहेत, अशी माहिती पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी खंडपीठाला दिली. 

टॅग्स :मुंबई