Join us  

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार निरुपम?

By मनोहर कुंभेजकर | Published: March 13, 2024 4:53 PM

आगामी लोकसभा निवडणुका लवकर  लागण्याची शक्यता आहे. सत्तारूढ महायुती आणि महाविकास आघाडीच जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून अद्याप जागावाटपाची अधिकृत घोषणा झाली नाही.

मनोहर कुंभेजकर, मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका लवकर  लागण्याची शक्यता आहे. सत्तारूढ महायुती आणि महाविकास आघाडीच जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून अद्याप जागावाटपाची अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र त्याआधीच गेल्या शनिवारी शिवसेना शाखांच्या भेटी दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय खेळी खेळत मुंबईत लोकसभेचा त्यांचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे.तर काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी काल रात्री भाजप नेते,राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची  निवासस्थानी भेट घेतल्याने त्यांना भाजप प्रवेश मिळणार का? आणि भाजप त्यांना येथून तिकीट देणार का? अशी राजकीय वर्तुळात व मतदार संघात जोरदार चर्चा आहे.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाला सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून संजय निरुपम हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करण्याचे आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपातून निवडणूक लढवणार असल्याची मतदार संघात चर्चा आहे.त्यामुळे अमोल कीर्तिकर विरोधात संजय निरुपम यांच्यात चुरशीची लढत होणार अशी चर्चा मतदार संघात आहे.

२०१९ च्या लोकसभा निडणुकीत महायुतीचे विजयी उमेदवार गजानन कीर्तिकर यांना ५,७०,०६३ तर त्यांच्या विरोधात पराभूत काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांना  ३,०९,७३५ मते मिळाली होती.कीर्तिकर यांनी निरुपम यांचा  २,६०,३२८ मतांनी पराभव केला होता.

निरुपम यांनी पराभव झाल्या नंतर पुन्हा हा मतदारसंघ बांधण्यास सुरवात केली होती.आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांनी येथून निवडणूक लढण्याचा ठाम निर्धार केला आहे.त्यामुळे ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात संजय निरुपम चुरशीची लढत होणार का? अशी चर्चा मतदार संघात आहे.

ठाकरे यांनी येथून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहिर केल्यावर निरुपम हे कमालीचे संतप्त झाले होते.त्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी या जागेवर उमेदवार जाहिर केल्यावर हल्लाबोल करत आपली नाराजी व्यक्त केली होती.याप्रकरणी काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी फारशी दखल घेतली नसल्याने निरुपम काँग्रेस वर नाराज आहेत.तर मुंबईतील उत्तर पश्चिम,दक्षिण मुंबई,दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई या जागा ठाकरे गट लढवणार असून उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन जागा काँग्रेस लढवणार असल्याचे सूत्र दिल्लीतच ठरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :मुंबईसंजय निरुपमकाँग्रेसलोकसभानिवडणूक