Join us

आयआरएस अधिकारी शक्तीवेल राजू यांच्या गाडीने दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू, एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 11:28 IST

आयआरएस अधिकारी शक्तीवेल राजू यांच्या गाडीने दोघांना उडवल्याची घटना घडली आहे

मुंबई- आयआरएस अधिकारी शक्तीवेल राजू यांच्या गाडीने दोघांना उडवल्याची घटना घडली आहे. मुंबईहून वाशीला जाताना मानखुर्दजवळ घटना घडल्याची माहिती मिळते आहे. शक्तीवेल राजू यांच्या गाडीने पांडुरंग कोकरे व अशोक भंडारी या दोघांना उडवलं. यामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या पांडुरंग कोकरे यांचा मृत्यू झाला असून अशोक भंडारी यांच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं समजतं आहे. दरम्यान, मानखुर्द पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र शक्तीवेल राजू यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

मुंबईतील मानखुर्द भागांत पहाटे पाँचच्या सुमारास ही घटना घडली आहे. मानखुर्द पोलिस चौकी येथे आयआरएस अधिकारी शक्तिवेल राजू यांची गाडी वेगाने आली आणि रस्त्यावरील दोघांना राजू यांच्या गाडीने जोरदार धडक दिली. आयआरएस शक्तिवेल राजू हे मद्यावस्थेत नव्हते असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.

मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी शक्तिवेध राजू यांना अटक केली असल्याची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय येरनेकर यानी दिली. राजू त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना तात्काळ जामीनदेखील दिला आहे.