मुंबई : सांताक्रूझ पोलिसांनी तब्बल १३ दिवसांच्या सातत्यपूर्ण तपासानंतर साखळी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून, मुंबई आणि ठाणे परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कुख्यात इराणी टोळीच्या सदस्याला अटक केली आहे. त्याचे नाव हुसैनी मुख्तार इराणी ऊर्फ गाझनी (२६) असे असून, तो कल्याण पश्चिमच्या अंबिवली परिसरात राहणारा असून, त्याच्यावर खडकपाडा, विठ्ठलवाडी, वार्तकनगर, महात्मा फुले, डोंबिवली, कोळसेवाडी आणि मानपाडा पोलिस ठाण्यांमध्ये दहापेक्षा अधिक चोऱ्या, साखळी चोरी आणि हल्ल्याचे गुन्हे नोंद आहेत.
२३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेसहा वाजता, ७७ वर्षीय सेवानिवृत्त एसीबीआय अधिकारी देवदास प्रभाकर रांगणेकर हे सांताक्रूझ (पश्चिम) येथील बिसेंट रोडवर सकाळी फेरफटका मारत होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी गणपती मंदिराची दिशा विचारण्याच्या बहाण्याने त्यांना अडवले. संभाषणादरम्यान मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. रांगणेकर यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी फरार झाले. त्यानंतर त्यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास अतिरिक्त पोलिस आयुक्त परमजितसिंह दहिया (पश्चिम विभाग), पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम, सहायक पोलिस आयुक्त मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
गुन्हे शोध पथकाने परिसरातील २५० ते ३५० सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषणासोबतच खबऱ्यांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. आरोपी पाटीलनगर, इराणी वस्ती, अंबिवली (कल्याण) येथे लपून बसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून एकाला अटक केली.