आयपीएल सट्ट्याचा खटला अडकला

By Admin | Updated: June 16, 2015 03:29 IST2015-06-16T03:29:37+5:302015-06-16T03:29:37+5:30

आयपीएल टी-२० सामन्यांवर कोट्यवधी रुपयांच्या सट्ट्याचे २०१३ मध्ये आरोपपत्र दाखल होऊनही प्रत्यक्षात याचा खटला अद्याप सुरू झालेला नाही.

IPL betting case gets stuck | आयपीएल सट्ट्याचा खटला अडकला

आयपीएल सट्ट्याचा खटला अडकला

अमर मोहिते,  मुंबई
आयपीएल टी-२० सामन्यांवर कोट्यवधी रुपयांच्या सट्ट्याचे २०१३ मध्ये आरोपपत्र दाखल होऊनही प्रत्यक्षात याचा खटला अद्याप सुरू झालेला नाही. या प्रकरणात बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एऩ श्रीनिवास यांचा जावई बी़ गुरूनाथ मयप्पन व अभिनेता विरेंदर दारासिंग रंधवा ऊर्फ विंदूसारखे दिग्गज आरोपी आहेत. त्यामुळे हा खटला सुरू न होण्याचे नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
टी-२० च्या सहाव्या पर्वात दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंग उघडकीस आणले. त्यानंतर गुन्हे शाखेने हे पर्व सुरू असतानाच मे २०१३ मध्ये या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांना अटक करण्यास सुरुवात केली. ही कारवाई पूर्ण करून गुन्हे शाखेने त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात मयप्पन, विंदूसह २२ जणांविरोधात याचे आरोपपत्र दाखल केले. पण नंतर अद्याप या आरोपींवर आरोप निश्चिती झालेली नाही व याच्या खटल्याचे कामकाजही सुरू झालेले नाही.
सध्या हे सर्व आरोपी जामिनावर आहेत. तसेच यानंतर आयपीएलचे दोन पर्वही झाले. मात्र सट्ट्याच्या या खटल्याला मुहूर्त मिळालेला नाही. या आरोपींवर सट्टा लावणे, कट रचणे, फसवणूक करणे, बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. आरोपपत्रात २०५ साक्षीदारांची यादी असून भारतातील ७, पाकिस्तानमधील १६ व दुबईतील २ आरोपींना फरार घोषित करण्यात आले आहे़ यामध्ये पाक पंच अरसद रौफ याचा समावेश आहे़

राजीव शुक्ला यांनी मयप्पनला बजावले होते
-आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याचे प्रकरण २०१३च्या पर्वात उघडकीस आले होते. तरी बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बी़ गुरूनाथ मयप्पन याला सट्टा लावल्याने फसवणूक झाल्याचे कळविले होते, असे गुन्हे शाखेने आरोपपत्रात नमूद केले आहे.
-शुक्ला यांनी मयप्पनला ई-मेल पाठवून ही माहिती दिली होती. २४ डिसेंबर २०११ व ९ जानेवारी २०१२ रोजी शुक्ला यांनी मयप्पनला हा मेल पाठवला होता़ त्यात त्यांनी टीम मालकाने क्रिकेटवर सट्टा लावल्याने व टीम संदर्भात माहिती बुकींना दिल्याने फसवणूक झाल्याचा उल्लेख केल्याचे गुन्हे शाखेने आरोपपत्रात नमूद केले आहे़
-महत्त्वाचे म्हणजे विंदू सामना सुरू होण्याआधी चेन्नई सुपर किंग्ज संघाची माहिती मयप्पनकडून घेत असे. चेन्नई येथील पावसाची परिस्थिती, मॅच होणार की नाही? यासंदर्भातही चौकशी करायचा़ टॉस जिंकल्यानंतर संघ फलंदाजी करणार की गोलंदाजी करणार हेदेखील विंदू मोबाइलवरून मयप्पनाला विचारायचा व सामना सुरू असताना स्टेडियममध्ये बसून सामन्यात नेमके काय होणार हे विचारायचा व ही माहिती मयप्पन त्याला देत असे.
-१२ मे २०१३ रोजी राजस्थान रॉयल विरुद्ध सुपर किंग्ज या सामन्यात चेन्नई १३० किंवा १४० धावा करेल, असे मयप्पन याने विंदूला सांगितले होते़ त्या दिवशी चेन्नईने १४१ धावा केल्या होत्या़ तसेच सामना राजस्थान जिंकेल, असा सट्टा मयप्पन याने लावला होता व हे तो सामना सुरू असताना विंदूला फोनवरून सांगत होता़ त्याचवेळी सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्याबाबत माहिती देताना रॉयल चॅलेंज बंगळूर हा संघ सामना हरेल, असे मयप्पनने विंदूला सांगितले होते़
-त्यानंतर दुसऱ्या दिवशी असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन हा संघ हरेल, असे सांगितले होते तर १४ मे २०१३ रोजीच्या सामन्यात विंदूने टॉस कोण जिंकणार, असे मयप्पनला विचारले होते व आपणच जिंकणार असल्याचे उत्तर मयप्पनने दिले होते़ ही सर्व माहिती आरोपपत्रात असून या दोघांच्या मोबाइल संभाषणातून हे पोलिसांना उपलब्ध झाले़ याद्वारे चेन्नई सुपर किंग्जचा टीम प्रिन्सिपल असताना मयप्पन विंदूद्वारे सट्टा लावत होता, असा दावा पोलिसांनी केला आहे़

अंगडियामार्फत सट्ट्याच्या पैशाची देवाणघेवाण...
आयपीएल सामन्यांवरील सट्ट्याचा पैसा अंगडियामार्फत पोहोचवला जात होता. विंदूने जयपूर व कोठारीला अंगडियामार्फत सट्ट्याच्या हारजीतचे पैसे येत असल्याचे मोबाइलवरून सांगितले होते, असे गुन्हे शाखेने आरोपपत्रात नमूद केले आहे़
तसेच विंदूने जुहू येथील स्वत:च्या घरीच जुगाराचा अड्डा सुरू केला होता़ या घरात तो बेटिंग स्वीकारत होता व लावतही होता़ हॉटेल ओकवूडमधूनही तो बुकी पवन जयपुरेसोबत सट्टा लावायचा़
पाक पंच अरसद रौफने १५ मे रोजीच्या सामन्यावर बेटिंग लावण्यास विंदूला सांगितले होते़ त्या वेळी आज ‘जिंदगी की हारजीत कर लेना’ असे रौफ विंदूला म्हणाला होता़ विंदू असदला भेटवस्तूही देत होता. त्यानेच त्याला भारतातून पळून जाण्याचा सल्ला दिला होता.
या आरोपपत्रात काही प्रेक्षकांच्याही साक्षी आहेत़ हे प्रेक्षक वानखेडे स्टेडियम येथे सामना बघण्यासाठी आले होते़ त्या वेळी रौफने बुकींना आपल्या भूमिकेची माहिती दिली व त्याने आपली फसवणूक झाल्याचे या साक्षीदारांनी साक्षीत म्हटले आहे़

आरोपींची नावे....
रमेश बजरंगलाल व्यास
पांडुरंग गोविंद कदम
अशोक लखपतराय व्यास
प्रवीण अंबालाल बेरा ऊर्फ पी़ डी़
नीरज वीरचंद शहा ऊर्फ चिंटू
पंकज धनजी शहा ऊर्फ लोटस
अल्पेशकुमार भगवानदास पटेल
विरेंदर दारासिंग रंधवा ऊर्फ विंदू
प्रेम रामचंद्र तनेजा
बी़ गुरूनाथ मयप्पन
दिनेश हरीश शर्मा
किशोर दयालदास पबलानी
अश्वनी जयनारायण
अग्रवाल ऊर्फ टिंकू दिल्ली
परेश विठ्ठल असरपोटा
किशोर लालचंद
बदलानी ऊर्फ केशू पुणे
रितेश नरेश बन्सल ऊर्फ भारत दिल्ली
शोभन सुबोध मेहता ऊर्फ शोभन
राकेश रतनचंद गंगवाल
ऊर्फ राकेश जयपूर
देवेंद्र श्रीपाल कोठारी
रामलाल हरकिसन जोव्हर ऊर्फ नोखा
बद्रीनारायण मोतीराम मोदी ऊर्फ बद्री
चंद्रप्रकाश उत्तमचंद जैन ऊर्फ ज्युपिटर

आरोपींना लावलेली कलमे...
466
बनावट न्यायालयीन किंवा सरकारी कागदपत्रे तयार करणे
शिक्षा - सात वर्षांपर्यंत शिक्षा व दंड.

34
एकत्रितपणे
गुन्हा करणे
१२० (ब) कट रचणे
शिक्षा : ६ महिन्यांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही

415
दिशाभूल करून आर्थिक किंवा शारीरिक हानी पोहोचवणे

417
गुन्ह्यासाठी एक वर्षाची शिक्षा किंवा दंड किंवा
दोन्ही

419
तोतयेगिरी करून दिशाभूल करणे. शिक्षा - तीन वर्षांपर्यंत किंवा दंड किंवा
दोन्ही


420
फसवणूक
शिक्षा - ७ वर्षांपर्यंत शिक्षा व दंड

468 बनावट कागद- पत्रांच्या आधारे फसवणूक केलेली.
शिक्षा : ७ वर्षे शिक्षा व दंड

471
कागदपत्रे बनावट असल्याचे ज्ञात असूनही त्याचा
वापर करणे

465
बनावट कागदपत्रे तयार करणे, शिक्षा : दोन वर्षांपर्यंत शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही

मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा...
अधिनियम ४ : जुगार खेळण्याचे अड्डे चालवणे
शिक्षा : तीन महिने व पाचशे रुपये दंड,
दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास सहा महिन्यांची शिक्षा व एक हजार रुपये दंड व तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास एक वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड

अधिनियम ५ : जुगाराच्या अड्ड्यावर जुगार खेळणे
शिक्षा : एक महिना व दोनशे रुपये दंड
दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास तीन
महिने व दोनशे रुपये दंड व
तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास सहा महिने व दोनशे रुपये दंड

महाराष्ट्र पोलीस अधिनियम
कलम १३० -
जुगार खेळणे
शिक्षा - अडीच हजार रुपये दंड

आरोप निश्चित नाहीत : न्यायालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख पडत असते. आरोपी या तारखांना हजेरी लावून जातात. मात्र या आरोपींवर आरोप निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे खटला सुरू होण्याचा प्रश्नच नाही.

Web Title: IPL betting case gets stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.