गतिरोधक देताहेत अपघाताला आमंत्रण
By Admin | Updated: January 30, 2015 22:42 IST2015-01-30T22:42:13+5:302015-01-30T22:42:13+5:30
दांड-रसायनी या सात किमीच्या रस्त्यावरील गतिरोधकांना व रस्त्याच्या साईडपट्टीला अस्पष्ट पांढरे पट्टे बसले आहेत.
गतिरोधक देताहेत अपघाताला आमंत्रण
राकेश खराडे, मोहोपाडा
दांड-रसायनी या सात किमीच्या रस्त्यावरील गतिरोधकांना व रस्त्याच्या साईडपट्टीला अस्पष्ट पांढरे पट्टे बसले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालविताना विविध समस्यांना सध्या सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर असणाऱ्या गतिरोधकांचे पांढरे पट्टे दिसेनासे झाल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.
गतिरोधक असणाऱ्या ठिकाणापासून चाळीस मीटर अंतरावर सुरक्षिततेसाठी पांढरे पट्टे असतात किंवा फलक लावण्यात आलेले असतात. पण या रस्त्यावर त्याचा अभाव दिसून येत असल्याने रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, या गरजेच्या बनलेल्या गतिरोधकांबाबत नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक उभारले जातात.
एखाद्या वेळेस कोणाला घाई असेल तर ते गतिरोधक दिसत नसल्यामुळे वाहने जोरात पळवली जातात. ऐनवेळी ब्रेक लागत नसल्याने वाहनांची गती कमी होत नाही, अशावेळी अपघात हमखास घडतात. दरम्यान, दांड-रसायनी रस्त्यावरील गतिरोधकांना पांढरे पट्टे नसल्याने काही वेळेस ज्येष्ठांना व गर्भवती महिलांना याचा त्रास सहन करावा लागतो. तरी संबंधितांनी दांड-रसायनी रस्त्यावरील गतिरोधकांना व साईडपट्टीला पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्याची मागणी होत आहे.