‘त्या’ २१ काेटींच्या युरेनियम प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:06 IST2021-05-10T04:06:34+5:302021-05-10T04:06:34+5:30
* केंद्रीय गृह विभागाचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अणुबॉम्ब व घातपाती कृत्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत ज्वालाग्रही अशा ...

‘त्या’ २१ काेटींच्या युरेनियम प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग
* केंद्रीय गृह विभागाचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अणुबॉम्ब व घातपाती कृत्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत ज्वालाग्रही अशा २१ काेटींच्या युरेनियमचा साठा जप्त केलेल्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी याप्रकरणी दोघांना नागपाडा येथून अटक करून तब्बल २१.३० कोटींचे ७.१ किलो युरेनियम जप्त केले होते. राष्ट्रविघातक कृत्यासाठी त्याचा वापर केला जाण्याची शक्यता होती. त्याबाबत सखोल तपास करण्यासाठी एनआयएकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाण्यातील जिगर पांड्या व अबू ताहिर अशी याप्रकरणी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. एटीएस त्यांच्याकडे तपास करीत होती. दरम्यान, एनआयएच्या पथकाने समांतर तपास करीत दोघांकडे चौकशी केली होती. दोघांना १२ मे पर्यंत एटीएसची कोठडी सुनावण्यात आली आहे.
जप्त केलेले युरेनियम तपासणीसाठी भाभा अणुशक्ती संशाेधन केंद्रात पाठविले होते. ते अत्यंत घातक असल्याचा अहवाल समाेर आला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा संवेदनशील विषय असल्याने तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला असून, पांड्या आणि ताहिर यांच्यावर ॲटोमिक एनर्जी ॲक्ट १९६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...........................